सांगली : कार-कंटेनर दुर्घटनेत जयसिंगपूरच्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

सांगली : कार-कंटेनर दुर्घटनेत जयसिंगपूरच्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
Published on
Updated on

इस्लामपूर/नेर्ले ; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगात असणार्‍या कारने थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जण मरण पावले. मृतांमध्ये गाडीचालक दीर, त्याची भावजय आणि 3 पुतण्यांचा (2 पुतण्या व एक पुतणी) समावेश आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कासेगाव (ता. वाळवा) जवळ शनिवारी दुपारी भरधाव कार रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कंटेनरवर आदळली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.

अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय 38, रा. जयसिंगपूर, सध्या वाकड, पुणे), स्मिता अभिनंदन शिरोटे (35), सुनेशा अभिनंदन शिरोटे (10), विरेन अभिनंदन शिरोटे (5), पूर्वा अभिनंदन शिरोटे (14, सर्व रा. जयसिंगपूर) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : मृत अरिंजय हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. ते पुणे येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी ते सुट्टीसाठी पुण्याला आलेल्या आपल्या भावाच्या मुलांना व भावजयला सोडण्यासाठी कार (एमएच 14 डीएन 6339) ने जयसिंगपूरला निघाले होते. दरम्यान, दुपारी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. यावेळी जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील व्यावसायिक तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अरिंजय शिरोटे हे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्या बाजूलाच पुतणी सुनेशा शिरोटे बसली होती. या दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर मागील सीटवर त्यांची भावजय स्मिता, पुतण्या विरेन व पुतणी पूर्वा हे बसले होते. अपघातात हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना या तिघांचाही मृत्यू झाला.

घटनास्थळावरील अपघाताचे द़ृश्य काळजाचा थरकाप उडविणारे होते. गाडीमध्ये काचांचा खच पडला होता. सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गाडीच्या डिक्कीमध्ये आंब्याची पेटी व इतर साहित्यही इतरत्र पडले होते. अपघात घडताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते व त्यांच्या पथकाने वाहतूक सुरळीत केली.

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. अपघातातील मृतदेहांची कासेगाव व इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली असून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news