तंबाखूमुळे दरवर्षी 10 लाख जणांचा मृत्यू : तंबाखूविराेधी दिन विशेष | पुढारी

तंबाखूमुळे दरवर्षी 10 लाख जणांचा मृत्यू : तंबाखूविराेधी दिन विशेष

सांगली ; विवेक दाभोळे : राज्यात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. महिलांमध्ये विशेषत: कष्टकरी महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, तरीदेखील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी न होता ते वाढतच आहे. तंबाखू सेवनाने देशात दरवर्षी साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा निष्कर्ष आहे शासनाच्या एका पाहणीचा.

तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृत, फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग आदी भयंकर रोगांना जणू आमंत्रण दिले जाते. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले, मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे आदी व्याधी जडतात. तसेच अकाली मृत्यूही ओढवतो. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते. राज्यात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. यातून आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शिवाय, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला तंबाखूमुळेच आयतेच आमंत्रण मिळत आहे. अत्यंत धोक्याची बाब म्हणजे, तंबाखू सेवनाचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळणारा वाढता टक्का चिंतेचाच ठरतो आहे.

मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक, दुर्धर आजारांना आमंत्रण देणारी म्हणून तंबाखूचा ‘बदलौकिक’ आहे. तंबाखूचे सेवन जीवावर बेतू शकते. नेमका हाच संदेश देत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पुढाकाराने सन 1987 पासून तंबाखू सेवनविरोधी दिवस पाळला जातो. या दिवशी विविध उपक्रमांतून तंबाखू सेवनाचे धोके द़ृग्गोच्चारित केले जातात.

कायद्याने बंदी; शिक्षेची तरतूद

तंबाखूचे धोके टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदी, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे, विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सूचना देणे याचा अंतर्भाव आहे. शासकीय कार्यालय व परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी आहे.

तंबाखू सेवन हे कोणत्याही स्वरूपात केले तरी ते आरोग्यासाठी घातकच आहे. तंबाखूचे व्यसन हे अत्यंत हानिकारक आहे. तंबाखू सेवन, धूम्रपानाने कर्करोगास आमंत्रण मिळते. देशात आढळणार्‍या कर्करोगाच्या रुग्णांपैकी तब्बल सत्तर टक्के रुग्णांना तंबाखू सेवन अथवा धूम्रपानानेच कर्करोगाची बाधा झाली आहे. यासाठी आपले आरोग्य आणि जीवन सुरक्षित राखण्यासाठी तंबाखूपासून दूर राहणेच हितकारक आहे.
– डॉ. श्रीनिकेतन काळे, प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ, सांगली

Back to top button