सांगली : नवतंत्रज्ञानामुळे राज्यातील शेती उत्पन्न वाढले

सांगली : नवतंत्रज्ञानामुळे राज्यातील शेती उत्पन्न वाढले

सांगली ; मोहन यादव : अचानक येणारी वादळे, महापूर आणि अवकाळी पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. तथापि, हिंमत न हरता शेतकरी नवतंत्रज्ञानाचा वापर करीत जिद्दीने शेतीत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधुनिकतेची कास धरल्याने गेल्या 10 वर्षांपासून राज्यातील शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

अलीकडच्या काही वर्षांत पर्यावरणातील बदलांमुळे पावसाची सरासरी वाढली आहे. मागील दोन वर्षांत राज्यात सरासरीच्या तुलनेत 112 टक्के पाऊस पडला आहे. जलसंधारणाच्या कामांवरोबर जलयुक्त शिवारचे कामही बर्‍यापैकी झाले आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. भूजल पातळी वाढत आहे. धरणांतील पाणीसाठा वर्षभर टिकून राहात असल्याने नद्यांद्वारे सिंचनाची सोय वर्षभर मिळत आहे. तलाव, विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी स्थिर राहत आहे. भूजल पातळी स्थिर राहत असल्याने त्याचा फायदा शेतीला होत आहे.

दुष्काळ गेला; महापूर आला

पुर्वी दुष्काळामुळे शेतीचे नुकसान होत होते. पण आता अतिवृष्टीचा फटका शेती क्षेत्राला बसताना दिसत आहे. प्रामुख्याने महापूर, अतिवृष्टी, गारपीट, ढगफुटी, चक्रीवादळ याची वारंवारता वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मे 2021 मध्ये 31 जिल्ह्यातील 0.91 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यापोटी सरकारला 112.26 कोटी भरपाई द्यावी लागली. याच वर्षात तोक्ते चक्रीवादळामुळे 17 जिल्ह्यांतील 0.17 लाख हेक्टरवरील कृषी क्षेत्राला 72.35 कोटी, महापुरामुळे 24 जिल्ह्यामध्ये 4.43 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यासाठी 336.67 कोटी भरपाई देण्यात आली. तसेच 28 जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 48.38 लाख हेक्टरवरील पिकांना 3,766.35 कोटी नुकसानभरपाई सरकारने दिली आहे.

कडधान्ये, भाजीपाल्याचे उत्पादन दुप्पट झाले

मागील काही वर्षांत शेतीत नवतंत्रज्ञानाचे वारे जोरात वाहत आहे. खते, बी-बियाणे, औषधे, ठिबक अशा अनेक नवनवीन सुविधा शेतकर्‍यांना मिळू लागल्या आहेत. यांत्रिकीकरण वेगाने वाढत आहे. यातूनच शेतीमालाचे उत्पादन वाढत आहे. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, भाजीपाला, फळे या पिकांच्या उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. कडधान्ये, भाजीपाला याचे उत्पादन दुप्पट झाले आहे. ऊस उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news