सांगली : आटपाडीत 12 जूनला समन्यायी पाणी वाटप ; शरद पवार, अजित पवार यांची उपस्थिती | पुढारी

सांगली : आटपाडीत 12 जूनला समन्यायी पाणी वाटप ; शरद पवार, अजित पवार यांची उपस्थिती

आटपाडी :  पुढारी वृत्तसेवा : बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या समन्यायी पाणी वाटप प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील दि. 12 जूनरोजी आटपाडी दौर्‍यावर येणार असल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांनी दिली. मुंबईत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. देशातील पहिला समन्यायी पाणी वाटप पथदर्शक प्रकल्प आटपाडी तालुक्यात राबविण्यात आला.

दरम्यान, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी राहिली. आनंदराव पाटील, भारत पाटील व सहकारी आणि मुख्यतः जनतेच्या लोक लढ्यातून टेंभूचे पाणी दुष्काळी तालुक्याला मिळाले. पाटणकर यांनी बंद पाईपलाईनने समन्यायी पाणी वाटप योजना श्रमिक मुक्ती दल व चळवळीच्या माध्यमातून मांडली. जनतेच्या रेट्यावर योजना आणि निधी मंजूर करून घेतला. सातत्याने कामाचा पाठपुरावा केल्याने समन्यायी पाणी वाटपाचे अशक्य काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
12 जूनरोजी या महत्वाकांक्षी पाणी वाटपाचा प्रारंभ होणार आहे. या दिवशी 108 गावांना पाणी देण्याच्या कामाचे उद्घाटन सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये होणार आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 1 जूनला बैठक
1993 पासून चालू असलेल्या जनतेच्या संघर्षाला अंतिम यश येणारा हा सुवर्णक्षण असल्यामुळे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 1 जूनला श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. आटपाडी येथे माणगंगा कृषी विद्यालयावर सकाळी 11 वाजता होणार्‍या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. पाटणकर व पाटील यांनी केले आहे.

Back to top button