सांगली : गर्भपात करून नांदविण्यास नकार | पुढारी

सांगली : गर्भपात करून नांदविण्यास नकार

सांगली :  पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंध निर्माण करून दुसरे लग्न केले. त्यानंतर नांदविण्यास नकार देत दोन वेळा गर्भपात करून शिवीगाळ, मारहाण केली. याप्रकरणी महिलेने पती व त्याचा मित्र या दोघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पहिले लग्न झाले होते. त्यानंतर संबंधित महिलेने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन संशयितासोबत दुसरे लग्न केले होते.

दुसर्‍या लग्नानंतर संबंधित महिला व संशयित हे दोघे सांगलीत एका भाड्याच्या घरात राहण्यास होते. लग्नानंतर संशयितानेे त्याच्या मित्राशी संगनमत करून महिलेचा दोन वेळा गर्भपात केला होता.

परंतु गेल्या काही दिवसांपासून संशयित हा महिलेला टाळत होता. तसेच घरखर्च चालविण्यासाठी पैसे देखील देत नव्हता. घरखर्च चालविण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर संशयिताने “मला तुझ्यासोबत राहायचे नाही, मला घटस्फोट दे, मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, म्हणून शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दुसरे लग्न करून दोन वेळा गर्भपात केल्याने संबंधित महिलेने संशयित आणि त्याचा मित्र यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Back to top button