‘त्या’ फार्महाऊसमधून 22.83 किलो गांजा जप्त | पुढारी

‘त्या’ फार्महाऊसमधून 22.83 किलो गांजा जप्त

मिरज : पुढारी वृत्तसेवा :  वड्डी (ता. मिरज) येथे एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून 22.83 किलो गांजा जप्त केला, अशी माहिती पुणे सीमा शुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे. याप्रकरणी शंकर शिंगाणा या व्यक्‍तीला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मिरजेतील एका उद्योजकाच्या वड्डी येथील फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने सांगलीच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने छापा टाकला होता.

त्या फार्म हाऊसवरून तब्बल 22.83 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची लाखो रुपये किंमत आहे. त्या फार्म हाऊसचा वॉचमन म्हणून काम करणार्‍या शिंगाणा यास सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली.

संबंधिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक’ पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. होती. मिरजेत पुण्याच्या सीमा शुल्क विभागाने थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहे.

Back to top button