सांगली : इंग्रजी शाळांचे प्रवेश फुल्ल; मराठीची धडपड सुरू | पुढारी

सांगली : इंग्रजी शाळांचे प्रवेश फुल्ल; मराठीची धडपड सुरू

सांगली; गणेश कांबळे : शिक्षणाला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्रजी माध्यमातील शिक्षण म्हणजे चांगला दर्जा आणि मराठी माध्यम म्हणजे कमी दर्जा अशी विभागणी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. कोविडमध्ये पालकांनी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. परंतु पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेश फुल्ल होताना दिसत आहेत.

2019 ते 2021 या कालावधी कोविडने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील बहुसंख्य शाळा बंद होत्या. इंग्रजी माध्यमाच्या, सीबीसीईच्या अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवला. शासनाने दहावी, बारावीच्या मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण केले. कोविड कमी होत असल्यामुळे यावर्षी आता सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. जूनपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. त्याअगोदर आता पाडव्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

मुलांना प्रवेश देण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आघाडी उघडली आहे. प्लेग्रुपपासून ते दहावी, बारावीपर्यंतचे वर्ग अनेक शाळांमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा दिसून येत आहे. शिक्षणाबरोबरच दुपारचे एकवेळचे जेवण, खेळ, स्वीमिंग, मुलांना ने-आण करण्यासाठी बसेस अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. पाच हजारांपासून ते 50 हजारांपर्यंतची फी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आकारण्यात येत आहे. कोविड काळात पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून मुलांना काढून मराठी शाळेत घालत होते. परंतु आता पुन्हा त्यांचे अ‍ॅडमिशन आमच्याकडे होत असल्याचे मेस्टाचे जिल्हाध्यक्ष मोहन माळी यांनी सांगितले. यावर्षी सर्व प्रवेश पूर्ण होतील, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.

मराठी माध्यमांच्या शाळांची धडपड सुरू
एकीकडे इंग्रजी माध्यमांकडे मुले प्रवेश घेत आहेत, तर दुसरीकडे पट टिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका शाळांची धडपड सुरू झाली आहे. कोविडच्या कालावधीत शाळा बंद होत्या. आता शाळेत मुलांना आणण्यासाठी नेत्यांपासून शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक कामाला लागले आहेत. पाडव्यापासून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून त्यांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाभर घेण्यात येत आहेत. विविध स्टॉलच्या माध्यमातून पालकांना माहिती देऊन प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी याला प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या 18 शाळा झाल्या सेमी इंग्लिश
इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळांमुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. सांगली, मिरज व कुपवाडमध्ये महापालिकेच्या 50 शाळा आहेत. त्यापैकी 18 शाळेत सेमी इंग्लिश शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून सांगली येथील शाळा क्रमांक 1, 7, 14, 17, 23, 26, 42, 45, मिरजेतील 1, 4, 11, 14, 16, 17, 19, 21, 3 व 23 अशा 18 मधून प्रायोगिक तत्त्वावर सेमी इंग्लिश शिकविण्यात येत आहेत. परंतु गणित हा एकच विषय इंग्रजीमधून शिकविण्यात येत आहे. त्याला खासगी इंग्रजी शाळांप्रमाणे स्वरूप मिळाल्यास विद्यार्थ्यांना नक्कीत फायदा होणार आहे.

मानधन तत्वावर शिक्षकांची भरती करणार : प्रशासन अधिकारी मलगुंडे

महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे म्हणाले, आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शाळांचा पट वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर सांगली व मिरजेतील शाळा क्रमांक 23 मध्ये संगणक लॅब उभारण्यात आले आहे. तसेच 20 लाख रुपये खर्चून सायन्स लॅबही उभी केली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. गेल्या वर्षी कोईमत्तूर येथील अब्दुल कलाम फौंडेशनने लघुउपगृह बनविला होता. त्यात महापालिकेच्या शाळेतील 10 विद्यार्थी व 10 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. शासनाकडून शिक्षकांची भरती होत नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून मानधन तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवरही लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button