सांगली : राष्ट्रवादीचा भाजपला 100 कोटींचा काटशह

सांगली : राष्ट्रवादीचा भाजपला 100 कोटींचा काटशह
Published on
Updated on

सांगली ; उद्धव पाटील : महानगपालिकेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली आहे. राजकीय पक्षांच्या पातळीवर या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेला 100 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. भाजपच्या शंभर कोटींना राष्ट्रवादीच्या शंभर कोटीने काटशह दिला आहे. निवडणुकीच्या राजकारणात राष्ट्रवादी सुसाट सुटली असताना काँग्रेसपुढे मात्र ताकद कायम ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

महानगरपालिकेच्या सन 2018 च्या निवडणुकीत भाजपने बहुमताने सत्ता हस्तगत केली. भाजपच्या या विजयाचे बक्षीस म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेला 100 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. राज्यातील भाजपच्या सत्ता काळात महानगरपालिकेला 23 कोटींचा निधीही आला. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटीतील उर्वरित 77 कोटींपैकी सुमारे 50 ते 55 कोटींचा निधी दिला.

भाजपने दिले होते आव्हान..!

महापालिकेत पक्षीय बलाबलात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या साथीने भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' करत महापालिकेतील सत्ता हिसकावून घेतली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही महापालिकेतील

या सत्तापरिवर्तनाचा 'पेढा' मोठ्या चवीने चाखला होता. दरम्यान 'सत्ता हिसकावून घेतलीत, 100 कोटी आणून दाखवा', असे आव्हान भाजपने राष्ट्रवादीला दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. सतत पाठपुरावा सुरू राहिला. अखेर सव्वावर्ष होत आल्यानंतर (निवडणूक वर्षावर येऊन ठेपल्यावर) उपमुख्यमंत्री पवार यांनी महानगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यातील पंचवीस कोटी रुपये तात्काळ मिळणार आहेत.

100 कोटींचा बुस्टर डोस

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीची तयारी गेली सव्वा-दीड वर्षापासूनच सुरू केली. महापालिका क्षेत्रात ताकद वाढवायची हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महापौर पद मिळवण्याची रणनिती आरंभली होती. कच्चे दुवे शोधून भाजपमधील काही नगरसेवकांना गळाला लावले. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळणी काँग्रेसला झाली नाही. खरेतर ती जुळणी राष्ट्रवादीने अगोदरच करून ठेवली होती. परिणामी राष्ट्रवादीने महापौरपद पटकावले. या पदाच्या महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी आपली राजकीय ताकद वाढवत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष वाढीसाठी 100 कोटींचा 'बुस्टर डोस' दिला आहे. 100 कोटींतून नागरी सुविधांची रखडलेली कामे झाल्यास त्याचा निश्‍चितपणे राष्ट्रवादीला फायदा होईल. रस्ते, भाजीमंडईची कामे, विस्तारीत व गुंठेवारी भागात पावसाचे पाणी साचून न राहण्यासाठी 'स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट', कुपवाड ड्रेनेज यासारख्या योजना मार्गी लावाव्या लागतील. महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसलाही विकास निधीतील वाटा मिळेल. त्याचा उपयोग करत महानगरपालिका क्षेत्रातील ताकद कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे.

38 कोटींनी आणली होती सत्ता…!

भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सन 2016-17 मध्ये सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी राज्याच्या 'नगरविकास'मधून आणला होता. राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. या निधीतून शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. विस्तारित, गुंठेवारीतील रस्त्यांचेही भाग्य उजाडले. या सर्वांचा परिणाम महानगरपालिकेच्या सन 2018 च्या निवडणुकीत झाला. या भागातील 53 पैकी 29 उमेदवार भाजपचे निवडून आले. 38 कोटींच्या निधीने महापालिकेतील भाजपचा विजय सुकर केला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 100 कोटींची घोषणा केली आहे. महापालिकेच्या सत्तेची गणिते या 100 कोटींवर मांडली जाऊ लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news