सांगली : कारची काच फोडून 37 तोळे दागिने लंपास | पुढारी

सांगली : कारची काच फोडून 37 तोळे दागिने लंपास

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : विजयनगर येथील हॉटेल सिलेब्रेशनच्या दारात पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने 14 लाख 81 हजारांचे 37 तोळे दागिने असलेली पर्स पळविली. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी सिद्धेश विजय माने (रा. बी वॉर्ड, ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, की माने हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीच्या मावस भावाचे मंगळवारी लग्न होते. त्यामुळे माने दाम्पत्य लग्नासाठी आले होते. सायंकाळी माने हे मिरज एमआयडीसी रस्त्यावरील सासूरवाडीत आले. रात्री ते विजयनगरला हॉटेल सिलेब्रेशनमध्ये जेवणासाठी आले.

त्यावेळी दागिन्याची पर्स कारमध्ये (एमएच 09 इयू 8325) सीटवर ठेवून दरवाजा लॉक केला होता. चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून आतील पर्स लांबविली. त्यामध्ये दहा तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा नेकलेस, दहा तोळ्यांचे दोन तोडे, दहा तोळ्यांच्या चार बांगड्या, दोन तोळ्यांची कर्णफुले, चांदीच्या खड्याचे मंगळसुत्र असा 14 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज होता.

जेवण झाल्यानंतर माने कारजवळ आले. तेव्हा त्यांना कारची काच फोडल्याचे दिसले. तेव्हा आतील सीटवर ठेवलेली पर्स लांबविल्याचे लक्षात आले. माने यांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगमध्ये वाढ

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोर्‍या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button