सांगलीत भीषण अपघातात दोन ठार; 15 गंभीर जखमी | पुढारी

सांगलीत भीषण अपघातात दोन ठार; 15 गंभीर जखमी

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मालवाहतूक टेम्पो व कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन ठार तर, 15 गंभीर जखमी झाले आहेत. सुभद्रा अर्जुन येळवीकर (वय 70), इर्शाद रफिक नदाफ (वय 33) अशी ठार झालेल्यांची नावेत आहेत. सांगलीतील आयुर्विन पुलावर बुधवारी रात्री हा भीषण अपघात झाला. मृत व जखमी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व तुंग परिसरातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जखमींमध्ये सुनिल नामदेव गुरव (वय 40), यशोदा खाबिले (वय 70), अशोक शांतिनाथ मालगावे (वय 42), फुलाबाई आप्पासाहेब खामकर (वय 40), हैदर पटेल (वय 35), सविता नवळे (वय 40), रुक्मिणी शिवाजी पवार (वय 70), जनाबाई बाजीराव पाटील (70), मंगल सोपान कापसे (55, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त समजताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला होता. मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. जखमी मदतीसाठी याचना करीत होते. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकांशी संपर्क साधला. सहा रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. जखमी व मृतांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मृत तुंग, कसबे डिग्रज परिसरातील असल्याची पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. मृत व जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाले होते. सहा जखमींना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. टेम्पोमधील सर्वजण तुंग (ता. मिरज) येथील आहेत. ते भजनी मंडळाचे कार्यकर्ते आहेत. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे भजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते निघाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. अपघाताची माहिती समजताच तुंग व कसबे डिग्रजमधील ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.

हेही वाचलत का ?

Back to top button