सांगली जिल्ह्यातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द | पुढारी

सांगली जिल्ह्यातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द

सांगली; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर युरीया खताची विक्री तपासणीत अनियमितता आढळल्याने, सांगली कृषि विभागाकडून जिल्ह्यातील 10 कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्राच्या नोंदींमध्ये गैरव्यवहार आढळल्याने कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

युरिया खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्षसाठा नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे, यासारख्या बाबींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत गैरव्यवहार आढळलेल्या विक्री केंद्राचे परवाने रद्द करत कृषि विभागाने कारवाई केली. जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणे विक्री केंद्रावर नजर ठेवण्यासाठी, एकूण ११ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. तर प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. या भरारी पथकामध्ये कृषि विभाग, जिल्हा परिषद कृषि विभाग, वजन मापे निरिक्षक यांचे प्रतिनिधी आहेत.

कृषि विभाग, पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात निविष्ठा बाबत तक्रार असल्यास, ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. येत्या खरीप हंगामात कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता व ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषि विभाग करत आहे. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलत क का ?

Back to top button