सांगली : अपराधीपणाच्या बोचणीने भाजपचे मौनव्रत | पुढारी

सांगली : अपराधीपणाच्या बोचणीने भाजपचे मौनव्रत

सांगली : पुढारी वृत्तसेवा
भाजपची सत्ता असलेल्या स्थाय समितीने घनकचरा प्रकल्पाची वादग्रस्त निविदा मंजूर केल्याप्रकरणी अपराधीपणाच्या भावनेतून पक्षाकडून सोमवारी ‘मौनव्रत’ आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या भूमिकेविरोधात व जनहिताविरोधात असलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या वादग्रस्त निविदेचा ठराव रद्द करावा. स्थायी समिती सभापती, सदस्यांनी आयुक्त व नगरविकास विभागाला ठरावाविरोधात पत्रे द्यावीत, या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक यांनी पक्षाच्या महानगर कार्यालयात मौनव्रत आंदोलन केले. भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी आंदोलन केले. भाजपचे नगरसेवक संजय कुलकर्णी, अप्सरा वायदंङे, लक्ष्मण नवलाई, गजानन मगदूम, सरचिटणीस मोहन वाटवे, केदार खाडिलकर, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मौन धारण करून आंदोलनात सहभाग घेतला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे व भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांना निवेदन दिले.
कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना व जनतेची प्रतिक्रिया लक्षात घेवून स्थायी समिती सभापती यांना व सर्व सदस्यांना घनकचरा ठरावाविरोधात पत्र देण्यासाठी आदेश करावेत. आदेश देवूनही पक्षविरोधी कार्यवाही करत असतील तर स्थायी समिती सभापती व सदस्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.

Back to top button