मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप-सेना कार्यकर्ते भिडले | पुढारी

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप-सेना कार्यकर्ते भिडले

सांगली : पुढारी वृत्तसेवा

पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी सोमवारी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भाजप-सेना कार्यकर्ते परस्परांना भिडले.

यावेळी काही कार्यकर्त्यांची पोलिसांशीही झटापट झाली. प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने आणि रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केल्याने दहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी भिलवडी, अंकलखोप, मौजे डिग्रज, कसबे डिग्रजची पाहणी केली. त्यांनी आयर्विन पुलाची पाहणी केली. त्या ठिकाणी मॅपद्वारे महापुराची पाहणी करून ते हरभट रस्त्यावर पाहणी करण्यासाठी आले.

त्या ठिकाणी भाजप, शिवेसनेचे कार्यकर्ते, विविध सामाजिक, व्यापारी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासाठी थांबले होते.

मुख्यमंत्री ठाकरे गाडीतून खाली उतरून व्यापारी आणि संघटनांचे निवेदने स्वीकारत असतानाच काही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा गाडीत बसण्यासाठी परत वळले. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यासाठी एकदम गर्दी झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांची गाडी थोडी पुढे गेल्यानंतर विठ्ठल पाटील निवेदन देण्यासाठी पुढे आले. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवून त्यांचे निवेदन स्वीकराले. त्यावेळी भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि गर्दी यामुळे चेंगराचेंगरी झाली.

भाजप-सेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सौम्य लाठीमारही केला. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी “कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला” अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसाठी जात असताना काहींनी पोलिसांची फळी भेदून मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला सारले.

मुख्यमंत्री ठाकरे हे त्यांच्या वाहनात बसल्याने “’मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही”, “मुख्यमंत्र्यांना आमची निवेदने स्वीकारला वेळ नाही. अशा मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

दुसर्‍या बाजूला एकाने मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हात आपटल्याचे एका शिवसेना कार्यकर्त्यास दिसून आले. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याला घेराओ घालत जाब विचारला. मात्र तो भाजपशी संबंधित नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते निघून गेले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हरभट रोडवर ठिय्या मारून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

साखळकर यांचे बोंबमारो आंदोलन

व्यापारी आणि पूरग्रस्तांचे म्हणणे मांडण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर देखील कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यासाठी आले होते. निवेदन स्वीकारले नसल्याने त्यांनी त्याठिकाणी निवेदन फाडून हवेत भिरकावले.

मुख्यमंत्र्यांना व्यापारी आणि नागरिकांचे काही देणे-घेणे नाही, व्यापारी, नागरिकांना भेटायचे नाहीतर इकडे कशाला आला आहात, असे म्हणत सतीश साखळकर यांनी बोंबमारो आंदोलन केले.

Back to top button