सांगली/कवठेमहांकाळ: देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय 38, रा. मिरज, मूळ गाव एरंडोली) आणि कोतवाल आनंदा पाटील (रा. देशिंग) यांना 25 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जमिनीच्या सात-बारा उतार्यावर खरेदी दस्ताची नोंद घालण्याकरिता ही रक्कम घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा उतार्यावर खरेदी दस्ताची नोंद घेण्यासाठी तलाठी पाटील याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत 25 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय कोतवाल आनंदा पाटील याने तलाठी पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी देशिंग येथील तलाठी कार्यालयाजवळ सापळा लावला. त्यात तलाठी पाटील याला तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेतले. कवठेमहांकाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुरज घाटगे, पोलिस अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ,सलीम मकानदार, राधिका माने, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.महसूल विभागात लाचेचे वाढते प्रमाण गेल्या काही वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लाचेची प्रकरणे वाढत आहेत. त्यातही विशेषत: महसूल विभागातील प्रकरणे वाढत आहेत. सात-बारावर नोंद घालणे, दुरुस्ती करणे आदी कारणासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास नोंद घालण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे लोकांत नाराजी आहे.