सांगली : पुढारी वृत्तसेवा : कृष्णा, वारणा नद्यांचा महापूर ओसरला आहे. परंतु, धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. सांगली जिल्ह्यातही दिवसभर रिमझिम सुरू आहे. तसेच कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणांतून पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे. अतिवृष्टी झाली तर महापुराचा धोका कायम आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात 31.7 मिमी पाऊस झाला. मिरज तालुक्यात 8.3, खानापूर-विटा तालुक्यात 1.3, वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 19.5, तासगाव तालुक्यात 2, आटपाडी तालुक्यात 0.2, कवठेमहांकाळ तालुक्यात 0.3, पलूस तालुक्यात 12.7 , कडेगाव तालुक्यात 3.4 मिमी पाऊस झाला.
याप्रमाणेच कोयना येथे 45, महाबळेश्वरला 63, नवजाला 71 मिमी पाऊस मागील 24 तासात (शुक्रवार ते शनिवार सकाळपर्यंत झाला आहे. शनिवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार होती. सांगली जिल्ह्यात पावसाची उघडझाप होती.
चांदोली धरणात 30.64 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणात 88.32 टीएमसी पाणी आहे. धोम धरणात 10.19, कण्हेर धरणात 7.62 पाणी आहे.
संभाव्य अतिवृष्टीच्या शक्यतेने पूरस्थिती उद्भवू नये यासाठी कोयना धरणातून प्रतिसेंकद 49 हजार 324, धोममधून 2586, कण्हेरमधून 3839 तर चांदोलीतून 14 हजार 389 पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. कृष्णा, वारणा या दोन्ही नद्यांची पाणी पात्रात गेले असले तरी पातळी स्थिर आहे.
रात्री उशिरा वाळवा तालुक्यातील बहे पूल येथे दहा फूट पाणी होते. वाळवा तालुक्यातील ताकारी पुलाजवळ 37, पलूस तालुक्यातील भिलवडीत 38 तर सांगलीतील आयर्विन पूल येथे 35.5 फूट अशी पाणी पातळी होती. धरणांतील विसर्गामुळे ही पातळी पुढील दोन दिवस कमी-जादा होईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.