सांगली : वादग्रस्त महासभेबाबत 20 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

सांगली : वादग्रस्त महासभेबाबत 20 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली महानगरपालिकेची दि. 18 फेब्रुवारीरोजी कोरम नसतानाही झालेली महासभा रद्द करावी, या मागणीसाठी भाजप व काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उच्च न्यायालयात न्या. ए. ए. सय्यद आणि न्या. अभय आहुजा यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

महापालिकेची महासभा दि. 18 फेब्रुवारीरोजी झाली. ऑफलाईन सभेसाठी भाजप व काँग्रेसने या सभेवर बहिष्कार घातला होता. ऑनलाईन महासभेत महत्वाच्या विषयांवर ऑनलाईन सविस्तर चर्चा करता येत नसल्याने ही सभा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी भाजप व काँग्रेसने केली होती. महापौरांनी ऑनलाईन महासभेला 32 नगरसेवक उपस्थित होते, असा दावा केला, तर कोरमअभावी झालेली महासभा बेकायदेशीर असल्याचा दावा काँग्रेस व भाजपने केला. ही महासभा रद्द करावी. मंजूर केलेले विषय रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेस व भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे केली.

जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल मागविला. प्रशासन, नगरविकास विभाग यांच्याकडून अद्याप निर्णय न झाल्याने कोरमअभावी झालेली महासभा रद्द करावी, या मागणीसाठी उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक संतोष पाटील, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या निकालाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Back to top button