सांगली : भाजप नेत्यांना राजकीय शत्रुत्वाची कावीळ | पुढारी

सांगली : भाजप नेत्यांना राजकीय शत्रुत्वाची कावीळ

सांगली : पुढारी वृत्तसेवा

राजकीय शत्रुत्वाची कावीळ झाल्यामुळे सांगलीतील भाजप नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसू लागले आहे. राजकारणापलीकडच्या मैत्रीतून भाजप नेते शेखर इनामदार यांचे नाव आमच्या नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इतका तिळपापड का झाला? इतका संताप येण्याचे कारण काय, असा सवाल महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांचे राज्यातील, देशातील विविध पक्षातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही जयंत पाटील यांच्यासोबतची मैत्री सांगली दौर्‍यात जपली. ना. गडकरी यांच्याकडून भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी थोडेसे शहाणपण घ्यावे. शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांच्याशी ना. पाटील यांची मैत्री लपलेली नाही.

खिलाडूवृत्तीने ती आमचे नेते मान्य करतात, 2008 साली मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्ता आणून इनामदार यांना उपमहापौर व देशपांडे यांना स्थायी समिती सभापती पदावर विराजमान करून त्यांना मोठे केले. हे दीपक शिंदे विसरले आहेत का? शेखर इनामदारांना तुम्ही साधे नगरसेवकही करू शकला नाहीत, याची जाणीव ठेवावी.

सूर्यवंशी म्हणाले, दीपक शिंदे यांच्याकडे खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीत शत्रुत्त्व काढावेसे वाटते. त्यामुळे त्यांनी यावर उपचार करून घ्यावेत. वॉर्ड क्रमांक 16 च्या पोटनिवडणुकीत भाजपचा एकतर्फी झालेला पराभव तुम्ही विसरला आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. या दरवाढीविरोधात तुम्ही का मूग गिळून गप्प आहात? वाढत्या दरावर आमच्या नेत्यांनी मत मांडल्यानंतर त्यांचा पारा चढला. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू होत्या, त्या होईपर्यंत इंधन दर वाढविले नाहीत. निवडणुका संपताच ते वाढविले. महापालिकेतील नगरसेवक आम्ही अमिष दाखवून विकत घेतल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. महापौर सूर्यवंशी म्हणाले,

वास्तविक अमिष दाखवून देशभरातील अनेक पक्षातील आमदार, माजी मंत्री भाजपमध्ये कसे गेले, त्यांना अमिष दाखविले की भीती? याचे उत्तर भाजपवाल्यांनीच द्यावे. आमचे कार्यक्रम करेक्टच असतात, कारण त्यात भाजपसारखी लबाडी नसते. त्यामुळे लबाडांनाच जग लबाड वाटते, त्यातली ही गत आहे.

नगरसेवक का फुटले याचे आत्मपरीक्षण करा

सूर्यवंशी म्हणाले, नुकत्याच झालेल्या महापौर निवडीत तुमचे सहा नगरसेवक का फुटले, याचे तुम्ही आत्मपरीक्षण करावे. केवळ तुमचे नेतृत्व मान्य नसल्यानेच व तुमच्या पक्षात सोनेरी टोळी आल्यानेच नगरसेवकांना वेगळा निर्णय घेणे भाग पडले. तुम्ही आधी तुमचे नगरसेवक सांभाळा आणि मगच आमच्या नेत्यांविरोधात बोला.

Back to top button