जयंत पाटील म्हणाले, सांगली बंधार्‍यासह म्हैसाळपर्यंतचे सर्व अडथळे काढणार | पुढारी

जयंत पाटील म्हणाले, सांगली बंधार्‍यासह म्हैसाळपर्यंतचे सर्व अडथळे काढणार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीला येणार्‍या महापुरावेळी सांगली ते सांगलीवाडी दरम्यान असणारा बंधारा पाणी वाहण्यास अडथळा ठरत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गतीने पुढे जाण्यासाठी सांगलीच्या बंधार्‍यासह म्हैसाळपर्यंत कृष्णा नदीत असणारे सर्व अडथळे काढणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

सांगलीवाडी येथे शंकरघाट ते आयर्विन पूल येथे बांधण्यात येणार्‍या पूर संरक्षण घाटाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, ग्रामीणचे अध्यक्ष अविनाश पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, राहुल पवार, हरिदास पाटील, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, अभिजित कोळी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, तोंडावर पावसाळा आहे.

गेल्या वर्षी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केल्याने काही प्रमाणात हाणी टाळता आली. शहरात कृष्णा नदीची पाणी पातळी 39 ते 42 फुटावर गेल्यावर शहरातील अनेक भागात पाणी शिरते. किमान ते पाणी तरी अडवण्यासाठी बायपास पूल ते सांगलीचा बंधारा, या नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचे नियोजन आहे. याचा चांगला फायदा होईल.

घाटाचा परिसर करणार चौपाटी

ते म्हणाले, सांगलीच्या बाजूला असणार्‍या विष्णू घाटाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सांगली आणि सांगलीवाडी अशा कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूला घाटाचा परिसर सुशोभित करणार आहे. नदीचा घाट चांगली चौपाटी होईल, प्रत्येकाला इथे निवांत वेळ घालवावा असे वाटेल, असे परिसर येत्या काही दिवसांत सुशोभित करणार आहे.

वसंतदादांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला

पालकमंत्री म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या कामासाठी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. स्मारकासाठी या समितीमार्फत देणगी गोळी केली जात होती; मात्र या समितीला कोणी देणगी देत नव्हते. आपल्या नेत्यांच्या स्मारकासाठी देणगी मिळत नाही, हे मला बरोबर वाटले नाही. यासाठी मी निधी दिला होता.

Back to top button