सांगली : भाजपने संस्थांना मदत केली नाही | पुढारी

सांगली : भाजपने संस्थांना मदत केली नाही

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

भाजपने आमच्या संस्थांना पुन्हा उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. फक्त आश्वासने दिली. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. मदतीचे आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाईक म्हणाले, आमच्या संस्था आर्थिक अडचणीत असताना भाजपने काहीही सकारात्मक पावले उचलली नाहीत. वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी ठोस काही केले नाही. आम्ही पक्षाची उभारणी राज्यात क्रमांक एकची केली होती. पण त्याची दखल घेतली नाही. मी भाजपचा आमदार असताना देखील मतदारसंघाच्या विकासासाठी उपेक्षाच पदरात पडली. त्यामुळे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी सांगितले की, शिराळा तालुक्यातील भाजपचे 21 गावांचे सरपंच, 8 गावांतील आघाडीचे सरपंच, 219 ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.वाळवा तालुक्यातील 8 गावांतील सरपंच, आघाडीचे 9 आणि 137 ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. 334 बूथ सदस्य, 84 शक्ती केंद्र, 14 आघाड्या, 13 सेल, 2100 पदाधिकारी यांनी तसेच शिराळा नगरपंचायतीच्या काही सदस्यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे.

नाईक म्हणाले, संकटात सापडलेल्या संस्थांना सर्व ती मदत करण्याची हमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी 1999-2004 या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. वाकुर्डे बुद्रूक योजना पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे. बंद पडलेल्या वारणा डाव्या कालव्याच्या कामास भरघोस निधी मिळाला आहे.

सुखदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, उत्तम पाटील, रणधीर नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर नाईक, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, प्रकाश पाटील, सरपंच विजय महाडिक, माजी उपसरपंच उत्तम पाटील, भरत निकम, ग्रामपंचाय सदस्य विश्वास पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते.

Back to top button