सांगली : विधानसभेची पुढील निवडणूकही मीच लढविणार | पुढारी

सांगली : विधानसभेची पुढील निवडणूकही मीच लढविणार

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली विधानसभा मतदारसंघात पुढील निवडणूक मीच लढविणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदारसंघात 425 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. त्यातील दोनशे कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लवकरच सुरू होतील, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, विनायक सिंहासने, दीपक माने, अ‍ॅड. स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील,विश्वजित पाटील, राहुल ढोपे, अतुल माने उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, आमदार स्थानिक विकास निधीतून 10 कोटी निधीतून रस्ते डांबरीकरण व गटार बांधकाम, सामाजिक सभागृह तसेच स्ट्रीट लाईट्सची कामे केली. जनसुविधा योजनेअंतर्गत 1 कोटी 85 लाख, तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 5 कोटी 4 लाखांचा निधी मंजूर करून दिला. जलजीवन मिशन योजनेमधून 2 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. नाबार्डमधून लहान पुलासाठी 7 कोटी, अर्थसंकल्पीय बजेटमधून रस्ते, ओव्हेरब्रीजसाठी 46 कोटींचा निधी मंजूर केला.

गाडगीळ म्हणाले, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटसाठी 90 लाख, व्हेंटीलेटर्ससाठी 26.50 लाख दिले. सिटीस्कॅन मशिन खरेदीस मान्यता मिळाली. 100 बेडच्या जिल्हा रुग्णालयासाठी 45.40 कोटी, माता व बालसंगोपन 100 बेड हॉस्पिटल 32.45 कोटी, नवजात शिशु रुग्णालसाठी 46.74 कोटी मंजूर झाले. महालॅबची निशुल्क सेवा सिव्हिलमध्ये सुरू करण्याची मागणी केली. पेठ-सांगली रस्त्याची निविदा काढून काम सुरू करण्याचे तसेच सांगली विधानसभा क्षेत्रांमधील 3 रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी 212 कोटी मंजुरीचे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

महामार्ग सांगलीतून; या दोनपैकी एक निश्‍चित

आमदार गाडगीळ म्हणाले, ‘पेठ-सांगली-मिरज’ महामार्ग ‘166 एच’ मधील भाग 2 हा सांगलीवाडी टोलनाका – बायपास रोड -कॉलेज कॉर्नर – कर्मवीर चौक – विजयनगर चौक ते मिरज (राष्ट्रीय महामार्ग 166) अथवा कॉलेज कॉर्नर – टिंबर एरिया – लक्ष्मी मंदिर – सूतगिरणी – कुपवाड एमआयडीसी- सावळी- तानंग फाटा – पंढरपूर रोड (राष्ट्रीय महामार्ग 166) असा असेल. डीपीआर सुरू आहे. या दोनपैकी एका रस्स्त्याचे ‘नॅशनल हायवे’मधून काँक्रिटीकरण होईल.

Back to top button