इस्लामपूर : ‘निशिकांत पाटलांना घाबरत नाही, त्यांच्याकडील फाईल कोणालाही द्याव्यात’ | पुढारी

इस्लामपूर : 'निशिकांत पाटलांना घाबरत नाही, त्यांच्याकडील फाईल कोणालाही द्याव्यात'

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : राजारामबापू कारखान्याची साखर अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तान या शत्रू राष्ट्रात विकली, हा माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी लावलेला जावईशोध आहे. त्यांनी हे विधान करून साखर कारखानदारी व साखर उद्योगाबद्दलच्या त्यांच्या अज्ञानाचे प्रदर्शन घडविले आहे. त्यांनी त्यांच्याकडील फाईल कोणालाही द्याव्यात, आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही, असा इशारा राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिला आहे.

ते म्हणाले, हा साखर कारखाना ही तालुक्यातील मातृसंस्था असून, या संस्थेने तालुक्यातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. अशा संस्थेबद्दल त्यांनी राजकीय आरोप करून आपली राजकीय उंची दाखवून दिली आहे, असा टोलाही त्यांनी दिला.

निशिकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राजारामबापू साखर कारखान्याबद्दल आरोप केले होते. त्यास पी. आर. पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे, नियमांचे तंतोतंत पालन करून आमच्या साखर कारखान्याची साखर निर्यात केली आहे. यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही.

पाटील म्हणाले, राज्यात व देशात अतिरिक्त साखर उत्पादनाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. त्याप्रमाणे राज्यातील, देशातील साखर कारखाने साखर निर्यात करीत आहेत. त्याप्रमाणे आम्हीही साखर निर्यात केली आहे. साखर विक्री ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात आहे.

स्थानिक बाजारपेठेत किती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किती साखर विकायची, याबद्दलचे धोरण हे केंद्र सरकार निश्चित करीत असते. केंद्र सरकारचे धोरण आणि नियमांच्या अधीन राहून आम्ही आमच्या साखर कारखान्याची साखर निर्यात केली असेल, तर त्यात काय चुकले?

निशिकांत पाटील यांच्या मंत्री जयंत पाटील हे दुसर्‍यांच्या संस्था अडचणीत आणीत असून युवा नेत्यांना राजकीय दबावाखाली दाबत आहेत, या म्हणण्यात तथ्य नाही. त्यांच्या या विधानाला राजकीय वास आहे. आता एखाद्याला नाचता येत नसेल आणि तो अंगण वाकडे म्हणायला लागला, दुसर्‍याला दोष द्यायला लागला, तर त्यास कोण काय करणार, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

निशिकांत पाटील यांनी यापुढे आमच्या संस्थेबद्दल लोकांची दिशाभूल करणारी, समाजात गैरसमज पसरविणारी विधाने करू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, दिलीपराव पाटील, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, अमोल पाटील उपस्थित होते.

Back to top button