सांगली : कवलापूर येथे बापाकडून मुलाचा खून; दोघे अटकेत | पुढारी

सांगली : कवलापूर येथे बापाकडून मुलाचा खून; दोघे अटकेत

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील कवलापूर (ता. मिरज) येथे विजय विलास सरगर (वय 21) या तरुणाचा त्याचे वडील विकास यांनीच आतेभावाच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी डोके वेगळे करून धड बुद्धीहाळ (ता. सांगोला) येथील तलावात टाकण्यात आला होता. विजय हा आई-वडिलांना सतत मारहाण करीत असल्याने त्रासून हा खून केल्याची कबुली संशयित विकास यांनी दिली आहे.

सांगली ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी विलास बाबू सरगर (वय 45) आणि त्याचा आतेभाऊ उत्तम मदने (वय 28, रा. कुपवाड, मूळ गाव कोळे, ता. सांगोला) या दोघांना अटक केली आहे.

सांगली ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः बुध्दीहाळ तलावामध्ये अज्ञात तरुणाचे डोके नसलेला मृतदेह आढळला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह चटईमध्ये दोरीने एका मोठ्या दगडासह बांधून तलावामध्ये टाकलेला होता. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाबाबतची माहिती आणि छायाचित्र सांगोला पोलिसांनी जिल्ह्यालगत असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांकडे पाठवले होते.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना कवलापूर येथील विजय सरगर हा काही दिवसांपासून गावातून बेपत्ता आहे आणि त्याचा खून झाला असावा, असा संशय असल्याची माहिती मिळाली. हा खून त्याच्या वडिलांनी काही साथीदारांच्या मदतीने केला असावा, अशीही माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पोलिसांनी पवार यांच्या घरी जाऊन माहिती घेतली. मात्र विजयबाबत घरच्यांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. निशानदार यांनी विजय याचे वडील विलास याला ताब्यात घेतले. विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितलेली हकीकत अशी ः “विजय हा घरात मला आणि त्याच्या आईला त्रास देत होता. त्यामुळे त्याचा मी आणि माझ्या साथीदारांनी खून केला आहे. आम्ही त्याचा मृतदेह सांगोला येथील बुध्दीहाळ तलावामध्ये चटईमध्ये बांधून आणि त्याला दगड बांधून टाकला होता”.

निशानदार यांनी या माहितीची सांगोला पोलिस ठाणे येथे खातरजमा केली. तेव्हा तिथे अज्ञाताचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी विलास सरगर आणि त्यांना मदत करणारा मदने या दोघांना अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅपे रिक्षा जप्त केली. संशयित आणि जप्त वाहन पुढील तपास करण्यासाठी सांगोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक निशानदार तसेच सहाय्यक फौजदार बाळकृष्ण गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रमेश कोळी यांनी या खुनाचा उलगडा केला.

Back to top button