सांगली महापूर : पुराचा सांगलीत मुक्काम; जिल्ह्यात ओसरला | पुढारी

सांगली महापूर : पुराचा सांगलीत मुक्काम; जिल्ह्यात ओसरला

सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगली मधील महापूर अगदीच संथ गतीने ओसरत आहे. पण, जिल्ह्यातील महापूर ओसरण्यास रविवारी रात्रीपासून सुरुवात झाली. वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील पूर ओसरला आहे. मिरजेलगत कृष्णा घाट, ढवळी, म्हैसाळ येथे पुराचे पाणी मुक्काम ठोकून आहे. मिरजेच्या उपनगरात पुराचे पाणी आहे. दरम्यान सोमवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव उडाली आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, साखर कारखाने टँकरव्दारे पाणी पुरवठा करीत आहेत. काही ठिकाणी दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतील वीज पुरवठा अद्यापही खंडित आहे. महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहेत. काही गावांत पूरग्रस्त परतू लागले आहेत. घरांची झालेली पडझड व शेती नुकसान पाहून त्यांना अश्रू अनावर होत आहेत. अनेकांनी मदत कार्य सुरु केले आहे.

वाळवा तालुक्यातील पूर ओसरण्यास शनिवारी रात्रीच सुरुवात झाली होती. रविवारीच अनेक रस्ते आणि पूल मोकळे झाले. शिराळा तालुक्यातही वारणा नदीकाठावरील काही गावे वगळता अन्यत्र पूर ओसरला आहे. वाळवा आणि शिराळा या दोन्ही तालुक्यांत आज पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी, धनगाव, अंकलखोप या भागातील पुराचे पाणीही ओसरले आहे. रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी मोकळे झाले होते. वाळवा, शिराळा,, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात रस्त्यांचीही वाताहत झाली आहे.

सांगली शहरात मात्र नदीकाठावरील गावभाग, सिद्धार्थनगर, शास्त्री चौक, टिळक चौक, दत्त-मारूती रस्ता, बापट बाल शाळेसमोरील भाग, शंभर फुटी रस्ता येथील पाणी सोमवारी रात्रीपर्यंत तरी ओसरलेले नव्हते. हरभट रस्ता, गणपती पेठ, श्री गणेश मंदिरासमोरील रस्ता, सराफ पेठ येथील पाणी आज सकाळीच ओसरले. मात्र आयर्विन पुलाजवळील टिळक चौकातील पाणी रात्रीपर्यंत मुक्काम ठोकून होते. राजवाडा परिसर आणि चौक महापालिका परिसर, मथुबाई कन्या महाविद्यालयाचा परिसर येथील पाणीही हटले नव्हते.

मुख्य एस.टी. बसस्थानकाच्या परिसरातील झुलेलाल चौकातील पाणी दुपारी तीननंतर कमी झाले. मात्र बसस्थानकासमोर पाणी कायम होते. शामरावनगर, वखारभाग, कर्नाळ रस्ता, मगरमच्छ कॉलनी, कोल्हापूर रस्ता, हरिपूर रस्ता, काळीवाट येथेही पाणी हटले नव्हते.

सांगलीतील गावभाग हा शहरातील सर्वात जुनी वसाहत. मात्र शुक्रवारी रात्रीपासून या गावभागाच्या भोवती पाण्याचा वेढा पडायला सुरूवात झाली होती. शनिवारी तो वेढा अगदी घट्ट झाला. गावभागात जाण्यासाठी शास्त्रीचौकाकडून, टिळक चौकातून, मारूती चौकातून आणि सिटी हायस्कूलसमोरून असे चार प्रमुख मार्ग आहेत. मात्र या सर्व ठिकाणी रात्रीपर्यंत पाणी होते. मारुती चौक आणि तेथून स्टँडकडे जाणार्‍या रस्त्यावर तर सहा ते सात फूट उंचीचे पाणी होते. त्यामुळे गावभागात कुणी जाऊ शकत नव्हते आणि तेथून कुणी बाहेर पडू शकत नव्हते. तिथे गेले तीन दिवस पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे तिथे राहिलेल्या लोकांचे हाल झाले. गावभागाला एकाद्या बेटासारखे स्वरुप आले होते.

लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा

सांगली शहरातील पाणी संथगतीने उतरत असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेची अगदी कसून परीक्षा सुरू होती. दर तासातासाला लोक पूर किती ओसरला आहे, याची चौकशी करीत होते. कोयना परिसरात पुन्हा अतिवृष्टी सुरू झाल्याची तेवढ्यात कुणीतही बातमी पसरवत होते. त्यामुळे लोकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. सगळ्या जिल्ह्यातील महापूर ओसरला;मात्र येथे का पाणी का वेगाने उतरत नाही, असा सवाल लोक विचारत होते.

Back to top button