सांगली : पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन गुरुवार (दि. 3) पासून सुरू करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र 81 हजार 697 हेक्टर आहे. त्यात जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या चार तालुक्यातील 71 हजार 697 हेक्टर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या दोन तालुक्यातील 10 हजार हेक्टर आहे.
या अगोदर गेल्या वर्षी ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये 2.50 टीएमसी कृष्णा नदीच्या पुराचे पाणी उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्यात आले होते. त्याचा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणी मागणी अर्ज जमा करण्याबाबत आवाहन केले होते. त्याशिवाय गावोगावी अभियान राबविण्यात आले होते. त्यावर गुरुवारपासून आवर्तन सुरू करण्याचे आदेश ना. पाटील यांनी अधिकार्यांना दिले आहेत. याचा लाभ क्षेत्रातील सर्व 6 तालुक्यांतील गावांना होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. पिकांना सतत पाणी द्यावे लागत आहे. पाणी पातळी खाली गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर योजनेचे पाणी सोडण्याची मागणी होत होती. आता आवर्तन सुरू होत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.