सांगली : ...तर शेतकऱ्यांचा 'सातबारा पीक पेरा' कोराच राहणार | पुढारी

सांगली : ...तर शेतकऱ्यांचा 'सातबारा पीक पेरा' कोराच राहणार

विटा : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांत ‘ई पीक पाहणी’ अँपवर शेती, पीक यासंदर्भातील सर्व माहिती आणि फोटो भरा अन्यथा खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा पीक पेरा कोराच राहणार असल्याचा इशारा खानापूरचे तहसिलदार ऋषीकेत शेळके यांनी दिला आहे.

खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम ई- पीक पाहणी माहिती भरण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहे. त्यानंतर रब्बी पिकांची माहिती आणि फोटो ई पीक पाहणीमध्ये अपलोड करता येणार नाही, अशी सूचना सर्व शेतकऱ्यांना तहसिलदार शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी कशी करावयाची याची माहिती यापूर्वीच दिली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ‘ई पीक पाहणी’ मध्ये पिकांसंदर्भातील सर्व माहिती भरावी. अद्यापही ज्यांनी ही माहिती भरली नसल्यास पुढील प्रक्रिया करावी.

प्रथम अँड्रॉइड मोबाईल वर प्ले स्टोर अँपवरून ‘ई पीक पाहणी’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे. यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची माहिती आणि फोटो यामध्ये भरावी. ज्यांनी पूर्वीच हे अँप डाऊनलोड केले आहे, त्यांनी यामध्ये रब्बी हंगाम अथवा ज्यांचे वार्षिक पिके असेल, त्यांनी वार्षिक हंगाम निवडून आपल्या पिकाची माहिती भरावी. याबरोबर शेतातील सिंचन साधनांचीही माहिती भरावी. संबंधित पिकांचे फोटो येत्या दोन दिवसात अपलोड करावेत. ही माहिती लवकरात लवकर न भरल्यास शेतकऱ्यांचा सातबारा पीक पेरा कोराच राहू शकतो, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असा इशाराही तहसीलदार शेळके यांनी दिली.

 

Back to top button