सांगली : महापुराचा विळखा नदीकाठावर हाहाकार | पुढारी

सांगली : महापुराचा विळखा नदीकाठावर हाहाकार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीला महापुराचा विळखा पडला असून नदीकाठावर हाहाकार उडाला आहे. कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस व कोयना, धोम, चांदोली धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठाला महापुराचा विळखा पडला आहे.

शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील अनेक गावे बुडाली आहेत. पिकांसह शेकडो रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हजारो लोकांनी पशुधनांसह स्थलांतर केले आहे. बचावासाठी एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.

दरम्यान, धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात दोन दिवस रेड अ‍ॅलर्ट व सांगली जिल्ह्यात एक दिवस यलो अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आल्याने पाणी आणखी वाढण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. उद्या (शनिवारी) पाणी सांगली शहरातील बाजारपेठेत घुसण्याचा धोका आहे. तसेच दोन्ही नदीकाठच्या शेकडो गावांतील महापुराचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
बुधवार, गुरुवारी पाणलोट क्षेत्रात तुफानी पाऊस पडला. यामुळे गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात दोन्ही नद्यांचे पाणी 10 ते 15 फूट वाढले.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात इस्लामपूर परिसरात 48.3,पलूस तालुक्यात 24.8, कडेगाव तालुक्यात 48.8, तासगाव तालुक्यात 10, मिरज तालुक्यात 19.8, खानापूर तालुक्यात 13.3, कवठेमहांकाळ तालुक्यात 2.8 मिमी पाऊस पडला. आज दिवसभरात (शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत) धरण परिसरात तुफानी पाऊस सुरू आहे. कोयना धरण भागात सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 125 मि.मी. पाऊस पडला. नवजाला 130 व महाबळेश्‍वरला 145 असा विक्रमी पाऊस पडला आहे. धोमला 61, कण्हेर धरण परिसरात 49 मिमी व कराड भागात मुसळधार पाऊस सुरुच आहे.

प्रतितास दीड लाख क्युसेक पाणी येत असल्याने कोयना धरण 81 टीएमसी भरले आहे. काल धरणातून प्रतिसेंकद 2100 क्युसेक पाणी सोडले जात होते. ते सकाळी सहा हजार करण्यात आले. दुपारी 10 हजार केले. तीन वाजता 35 हजार तर सायंकाळी 54 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. धोममधून चार हजार तर कण्हेरमधूनही सहा हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील नदीकाठच्या शेकडो गावांत पाणी घुसले आहे. हजारो घरे बुडाली आहेत. जिवाच्या धास्तीने हजारो लोकांना पशुधनांसह स्थलांतर सुरू केले आहे. नदीकाठी हाहा:कार उडाला आहे.

तसेच वारणा नदीवरील चांदोली चांदोली धरण परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठ ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासांत तब्बल 574 मिलिमीटर पाऊस येथे कोसळला आहे. चांदोलीच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी 24 तासात सव्वापाच मीटरने तर पाणीसाठा साडेचार टीएमसीने वाढला आहे. धरणात 70 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

मुसळधार पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक यामुळे धरणातील विसर्ग 30 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली असून शिराळा पश्चिम भागातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदीकाठासह अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली आहे. जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.शनिवारी सायंकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी दहा ते 12 फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीकाठच्या आणखी काही गावांत पाणी घुसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 25 ते 30 रस्ते पाण्याखाली
शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर या तालुक्यांमधील 25 ते 30 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राज्य महामार्ग 8 व प्रमुख जिल्हा मार्ग 17 अशा 25 रस्त्यांचा समावेश आहे. शिराळा तालुक्यातील मांगले-सावर्डे, सोंडोली-चरण, बिळाशी- भेसडगाव, सुजयनगर, भाडूगळेवाडी- काळुंद्रे. मिरज तालुका : समडोळी-कोथळी, नांद्रे- ब्रह्मनाळ. वाळवा तालुका: कासेगाव, काळमवाडी, केदारवाडी, साखराळे, खेड, पुणदी, पेठ, महादेववाडी, माणिकवाडी,वाटेगाव,गौंडवाडी, मसुचीवाडी, वाळवा,आष्टा, बहे, नेर्ले बनेवाडी, शिरगाव, नागठाणे, कणेगाव-भरतवाडी, पेठ- गोळेवाडी, तुकाईखाडी, कृष्णाघाट, नेर्ले-बोरगाव, देसाई मळा- मुलाणवाडी, ऐतवडे खुर्द- पारगाव. पलूस तालुका : भिलवडी-माळवाडी, राडेवाडी-औंदुबर, कुंडल-शेरे दुधोंडी, आमणापूर-बुर्ली, दुधोंडी-नागराळे, अंकलखोप- संतगाव, आमणापूर-धनगाव. तसेच इतर शेकडो लहान रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तातडीने स्थलांतर व्हावे : जिल्हाधिकारी चौधरी
जिल्ह्यात आतापर्यंत 100 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांनी व्यवस्था दोन निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. जसजशी ही संख्या वाढेल त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:च स्थलांतरासाठी त्वरित प्रतिसाद द्यावा. प्रशासनाला सहकार्य करावे. सांगलीत बाजारपेठेत पाणी येऊ शकते. त्यामुळे व्यापार्‍यांना त्यांच्या साहित्याची हलवाहलव करावयाची असल्यास त्यांनाही मुभा देण्यात आली आहे.

एनडीआरएफची दोन पथके दाखल
महापुरामुळे एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण केले आहे. त्यापैकी एक पथक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. ते आष्टा व शिरगाव याठिकाणी कार्यरत आहे. रात्री दुसरे पथक सांगली शहरात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. नागरिकांना बोटींमार्फत मदत करण्याची वेळ येवू देऊ नये, वेळ आहे तोपर्यंत त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पाणी पातळी 49 पर्यंत स्थिर ठेवण्याचे प्रयत्न : मंत्री जयंत पाटील

जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कृष्णा खोर्‍यातील पूरपरिस्थिती तीव्र व गंभीर होत आहे. त्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाकडून सुरू आहेत. नवजा जिल्हा सातारा येथे चोवीस तासात 731, कोयना परिसरात 604 मिमी पाऊस झाला आहे. चोवीस तासांमध्ये कोयना धरणामध्ये 12 टीएमसी पाणी आले आहे. आज अंदाजे 18 टीएमसी पाणी कोयना धरणामध्ये येईल. त्यामुळे कोयना धरणातील विसर्ग वाढविण्यात येत आहे. तसेच धरणाच्या पुढील गावांमध्ये पावसाचा जोर आहे.

संकटात असलेल्या गावांतील लोकांनी जनावरे, अत्यंत आवश्यक असलेले साहित्य घेवून लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे. सध्या आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 44 फुटांपेक्षा अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळपर्यंत आणखी 10 ते 12 फूट वाढण्याची शक्यता आहे. सांगलीत आयर्विंन पुलाखाली पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल. त्यामुळे सांगली शहरातील आवश्यक त्या सर्वांचे स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पाणी पातळी 49 पर्यंत स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाटील म्हणाले,कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रशासनाशी सतत संपर्क आहे. यांना विसर्ग वाढविण्याबाबत विनंती केली आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळीच नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे प्राधान्याने स्थालांतरण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम कामाला लागली आहे. परंतु बोटींची वाट न पाहता सध्या सुरू असलेल्या वाटांवरुन नागरिकांनी स्थलांतर करावे.

जिल्ह्यातील 59 गावांचा वीज पुरवठा खंडित

पाऊस व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 37 गावांचा वीजपुरवठ बाधित तर 22 गावांचा अंशत: बाधित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 33 हजार 291 ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर झाला आहे. ग्रामीण विभागातील 1 उपकेंद्रे (ब्रम्हनाळ),25 वीजवाहिन्या, 364 वितरण रोहित्रे बंद असल्याने 17 गावांचा वीज पूरवठा अंशत: बाधित झाला. तर 4 हजार 543 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. इस्लामपूर विभागातील 5 उपकेंद्रे (पाणुंब्रे, सिरशी, शिराळा, ताडवले, मागंले ), 28 वीजवाहिन्या व 941 वितरण रोहित्रे बंद असल्याने आष्टा, इस्लामपूर व शिराळा या उपविभागातील 34 गावांचा वीजपुरवठा पूर्णत: बाधित झाला आहे. 25 हजार 164 ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कांडूर उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. विटा विभागातील 8 वाहिन्या व 113 वितरण रोहित्रे बंद असल्याने पलूस, कडेगाव, खानापूर या उपविभागातील 3 गावांची वीज खंडित तर 5 गावांचा पुरवठा अंशत: बाधित झाला आहे. 12 हजार 903 ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अलमट्टीतून विसर्ग वाढविला

अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. या धरणात सध्या धरणात दीड ते दोन लाख क्युसेक पाणी सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातून जात आहे. त्यामुळे धरणात 90 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना, चांदोलीतील विसर्ग वाढविला असल्याने सांगलीत पाण्याची फुग येत आहे. त्यामुळे या धरणातून तीन लाख विसर्ग सुरू केला आहे. तो आणखी वाढविण्याची मागणी सांगली जिल्ह्यातून होत आहे.

जीवित हानी टाळण्याकडे लक्ष : मंत्री कदम

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, मुसळधार पावसाने ओढवलेल्या पूरस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे.जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रांची पाहणी केली आहे. विशेषतः सांगली परिसरावर मी सातत्याने लक्ष ठेवून आहे. प्रशासनासह सर्व संबंधित घटकांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहे. जीवित हानी टाळण्यावर आमचा भर आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

Back to top button