सांगली : कुपवाडमध्ये 61 हजार पाणी कनेक्शनचा सर्व्हे सुरू

सांगली : कुपवाडमध्ये 61 हजार पाणी कनेक्शनचा सर्व्हे सुरू
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली व कुपवाडमधील 60 हजार 600 पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने अनधिकृत 15 पाणी कनेक्शन्स तोडण्यात आली.
अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी बैठक घेतली. उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी आप्पा अलकुडे, विशेष अभियंता सुनील पाटील, अधीक्षक उज्ज्वला शिंदे उपस्थित होते.
आयुक्त कापडणीस यांनी तातडीने नळ कनेक्शनचा सर्वे सुरू करण्याचे आदेश दिले. बुधवारपासून पाणीपुरवठा विभागाकडून सांगली आणि कुपवाड भागातील अनधिकृत पाणी कनेक्शन शोधण्यासाठी सर्वे सुरू झाला. पाणीपुरवठा अधीक्षक उज्ज्वला शिंदे यांच्या सूचनेनुसार 31 कर्मचारी सांगली आणि कुपवाडमधील 60 हजार 600 नळ कनेक्शनचा सर्वे करत आहेत.
या सर्वेमध्ये अनधिकृत आढळून येणार्‍या कनेक्शनधारकावर कारवाई केली जाणार आहे. पाणी कनेक्शन बंद केले जाणार आहे. नागरिकांनी कनेक्शनबाबतची माहिती महापालिका कर्मचार्‍यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा अधीक्षक उज्ज्वला शिंदे यांनी केले आहे.

सांगलीतील जुना बुधगाव रोड, शिंदेमळा, कलानगर परिसरात 15 नळ कनेक्शन अनधिकृत आढळून आले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्याची गंभीर दखल घेतली. सर्व 15 कनेक्शन तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी आप्पा हालकुडे, विशेष अभियंता सुनील पाटील यांच्या पथकाने बुधवारी 15 अनधिकृत नळ कनेक्शन बंद केली. पाणी बिलातील घोटाळा, अनधिकृत पाणी कनेक्शनबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांची बैठक झाली. पाणीपट्टी व घरपट्टी विभागाचे एकत्रिकरणाबाबत चर्चा झाली. पाणीमीटर बंद असल्यास दुप्पट पाणीपट्टी आकारणीचा विषयही चर्चेत आला.

दहा हजार घेतले; पावती दोनशेची; आजअखेर बिल नाही

गजराज पार्क यशवंतनगर येथील गुराप्पा पुजारी यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. अर्जात म्हटले आहे की, दि. 10 मे 2020 रोजी आमच्या भागातील अनोळखी व्यक्ती व महापालिका पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांनी पाणी कनेक्शन देतो म्हणून 10 हजार रुपये घेतले.दि. 18 मे रोजी 200 रुपयांची पावती दिली. त्यानंतर तीन महिन्यांनी पाणी कनेक्शन जोडून दिले. आजपर्यंत आमच्याकडे कोणीही पाणी बिल, मीटर चेकिंगसाठी आलेले नाही. मीटर रीडिंग घेऊन पाणी बिल द्यावे.

मीटर रीडिंगसाठी एक वर्षाने आले

घरी पाणी कनेक्शन घेऊन एक वर्ष झाले आहे. मीटर रिडींगसाठी कोणीही आले नव्हते. वृत्तपत्रात बातम्या येऊ लागल्याने बुधवारी कर्मचारी मीटर रिडींग घेऊन गेले, असे नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news