आमचे साहेब कुटूंब वत्सल : प्रतिक जयंत पाटील | पुढारी

आमचे साहेब कुटूंब वत्सल : प्रतिक जयंत पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटील वाढदिवस विशेष…

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी साहेब अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात आले. बघता- बघता 37-38 वर्षाचा काळ कधी लोटला कळलेही नाही. या कालावधीत त्यांनी बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था सक्षमपणे पुढे वाढविल्या. या वाटचालीत बापूंच्या इतकाच वाळवा तालुक्यातील जनतेला त्यांनी जीव लावला आहे. मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान केलेले आहे. मला त्यांचा मुलगा म्हणून याचा सार्थ अभिमान आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंब म्हणून आम्हास वेळ दिला आहे. कुटूंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. साहेब हे कुटूंब वत्सल आहेत.

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. नंतर आपले आयुष्य समाजाच्या सेवेस वाहून घेतले आहे. त्यांनी लोकल बोर्डचे प्रेसिडेंट म्हणून काम करताना गांव तिथे आड, गांव तिथे शाळा, गावाला जोडणारे रस्ते आदी आदर्शवत कामे केली. राज्याचे महसूल, वीज, उद्योग, अर्थ, ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या जडण घडणीत मोठे योगदान केलेले आहे. साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सहकारी बँक, सहकारी दूध संघ आदी अनेक संस्था स्थापन करून तालुक्याच्या विकासाला गती दिली आहे. त्यांनी केवळ वाळवा तालुका नव्हे, तर संपूर्ण राज्यात अनेक सामान्य कुटूंबातील तरुण कार्यकर्त्यां ना संधी देत कार्यकर्ते घडविले आहेत. बापूही कुटूंबवत्सल होते. बापूंच्या अकाली निधनाने कार्यकर्ते, व तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर साहेबांना सार्वजनिक जीवनात यावे लागले.

साहेबांनी 21 व्या वर्षी बापूंच्या विचाराने वाळवा तालुक्यात गावोगावी पदयात्रा काढून शेतकर्‍यांना पाण्याचे महत्व पटवून देत साखर कारखान्याच्या माध्यमातून 37 सहकारी पाणी पुरवठा संस्था उभा केल्या, हे साहेबांचे काम वाळवा तालुक्याच्या विकासाचा पाया ठरले आहे. साहेबांचे हे काम राज्यात अद्वितीय असेच आहे..आजचा समृध्द, श्रीमंत वाळवा तालुका ही ओळख पाणी पुरवठा संस्थांच्या उभारणीतून निर्माण झाली आहे.

आपल्या साहेबांनी 38 वर्षाच्या कालखंडात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्य साखर संघाचे अध्यक्ष, राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्राम विकासमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. सध्या ते राज्याचे जल संपदामंत्री, सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद या पदांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. साहेब राज्य पातळीवर प्रदीर्घ काळ कार्यरत, तसेच वाळवा तालुक्यातील अनेक राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत आहेत, तरीही इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या पांढर्‍या शुभ्र कपड्यावर एकही डाग नाही,ही आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या कामातून वाळवा तालुक्यातील जनतेची मान कायम उंचविलीच आहे.

राज्यातील एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, शांत, संयमी नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी बापूंचा जनसेवेचा वसा, व वारसा समर्थपणे पुढे नेताना आपल्या कुटुंबासही वेळ दिला आहे. त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण देताना, आमच्यावर चांगले संस्कारही केले आहेत.

आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे अशी प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. साहेबांची तशी अपेक्षा मी, व राजवर्धनबद्दल होती. ते नेहमी सांगायचे खूप शिका, मोठे व्हा. बापू पप्पांना, काकांना (भगतदादा पाटील) म्हणायचे,‘चांगले शिका. नाही तर कासेगावला जावून म्हशी राखाव्या लागतील.’ तसेच साहेबही मला व राजवर्धनला म्हणायचे, ‘चांगले शिका नाहीतर, कासेगावला जावून शेती करावी लागेल.’ सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, समस्या खोलात जावून समजून घेत त्यांना मदतीचा हात द्यायला हवा, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.

मी हायस्कूलमध्ये शिकत असताना, अभ्यास कमी करायचो. दरवर्षी हेड मास्तर पालकांना शाळेत बोलावून मुलांचा अभ्यासाचा रिपोर्ट द्यायचे. साहेब दरवर्षी वेळ काढून यायचे, आमचा वार्षिक रिपोर्ट समजून घ्यायचे. त्यांना जिथे आम्ही कमी वाटायचो, ते व्यवस्थित करायला आम्हाला प्रोत्साहित करायचे. माझा सायन्स हा विषय कच्चा होता. साहेब आपली कामे आटपून वेळ काढायचे. ते मला सायन्स विषय शिकवायचे. मला आठवते, केमिस्ट्रीतील पॅरॉडिकल टेबल मला त्यांनी शिकविली आहेत. आपल्या मुलांचा कोणताही विषय कच्चा राहू नये, त्यांनी सर्व विषयात पारंगत असावे, ही एका वडिलांची तळमळ त्यामागे होती. आमच्या क्रिकेटच्या मॅचेस असायच्या. पप्पा मंत्रालयातील कामे आटपून मुद्दाम वेळ काढून मॅचेस पहायला यायचे. मागे बसून ते आमचा खेळ पहायचे. मला जवळ बोलावून मॅचचे अपडेट घ्यायचे. ते आमच्या खेळाचे कौतुक करायचे.

आम्ही इस्लामपूरला विशेषतः मुंबईला असताना साहेब वेळ काढून मला, राजवर्धनला बाहेर जेवायला घेवून जातात. आम्ही वेळ मिळेल तेव्हा, घरी टी.व्ही.वर पिक्चर पाहतो. ते वडील म्हणून आम्हाला वेळ देतात.

सार्वजनिक जीवन असो, अथवा व्यवसाय. तुम्ही स्वतःच्या कामातून उभा रहायला हवे, शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. स्व. बापूंच्या अकाली जाण्याने साहेब सार्वजनिक जीवनात आले. ते वाळवा तालुका व तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखाशी समरस झाले. लोकांचे प्रश्न, समस्या समजून घेत त्या सोडविण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या जनतेच्या जीवनात समृध्दी आणताना राज्याच्या प्रगती मध्ये मोलाचे योगदान दिले आहे, देत आहेत. ते जे काम करीत आहेत, त्याच कामात आम्हालाही आवड निर्माण झाली आहे. तेच काम आम्ही करीत आहोत. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यासाठी झोकून देवून काम केल्यास आपण नक्की यश मिळवू,असा संदेश आम्ही त्यांच्याकडून घेतला आहे.

साहेब, राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने राज्यात फिरावे लागत आहे. इकडे इस्लामपूरला मतदारसंघातील लोक, जिल्ह्यातील लोक त्यांना भेटायला येतात. मी आता साहेबांना मदत करण्याचे काम करीत आहे. लोकांना भेटण्याचा, लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या व्यवसाय करीत समाजकारण शिकत आहे. यामध्ये राजकारण हा दुसरा मुद्दा आहे. साहेबांच्या हातून राज्यातील जनतेची अधिकाअधिक सेवा घडो, या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

– प्रतिक जयंतराव पाटील, युवा नेते

Back to top button