सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली मध्ये पूरपट्ट्यावर १६ कॅमेर्यांची नजर आहे. सांगलीत पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची 'वॉररूम' डोळ्यात तेल घाऊन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. पूरपट्ट्यावर 16 कॅमेर्यांची नजर रोखली आहे.
उपाययोजनांची सज्जता ठेवण्यात आली आहे. 11 बोटी तैनात केल्या आहेत. विभागनिहाय अधिकारी, कर्मचर्यांवर जबाबदार्या निश्चित केल्या आहेत.
पाणलोट क्षेत्रात अतिपावसामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. शुक्रवारी सकाळी कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. सांगलीत गुरूवारी सायंकाळी 6 वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 26 फूट इतकी होती. पाणी पातळी शुक्रवारपर्यंत पाणीपातळी वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटापर्यंत आल्यास पुराचे पाणी नागरी वस्तीत सूर्यवंशी प्लॉटमध्ये शिरते. पाणी 31 फुटापर्यंत गेल्यास इनामदार प्लॉटमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यानंतर कर्नाळ रोड, बायपास चौक, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी परिसरात पाणी शिरते.
आपत्ती व्यवस्थापनच्या 'वॉररूम' मधून पूरपट्ट्यावर 16 सीसीटीव्ही कॅमेर्यांतून 'वॉच' ठेवला जात आहे. पाणी पातळी वाढेल तसे वॉकीटॉकीवरून संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना 'मेसेज' पाठविला जाईल.
सीसीटीव्ही कॅमेरे
आयर्विन पुलाजवळ सरकारी घाट, न्यू प्राईड बायपास, दत्तनगर कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी, साईमंदिर काळीवाट, अमरधाम, पाणीपुरवठा जॅकवेल कर्नाळ रोड, मगरमच्छ कॉलनी 1, मगरमच्छ कॉलनी 2, सूर्यवंशी प्लॉट जामवाडी, बाळूमामा मंदिर बायपास रोड शिवशंभो चौक, मनपा जुने फायर स्टेशन 1 व 2, मनपा फायर स्टेशन टिंबर एरिया, खाडे बोळ धरणरोड सांगलीवाडी, कृष्णाघाट मिरज.
पाणी पातळी बाधित होणारे क्षेत्र
पावसाने शहर, उपनगरांची झाली दैना
सांगली : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांच्या पावसाने सांगली शहर व उपनगरांची दैना उडाली आहे. रस्ते राडेराड झाले आहेत. जागोजागी रस्त्यांवर साचलेले पाणी आणि खड्डे यामुळे वाहनधारकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. हे हाल केव्हा संपणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जूनच्या तिसर्या आठवड्यात झालेल्या पावसाने महापालिका क्षेत्राची दैना उडाली होती. पाऊस व नाल्यांचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले होते. दरम्यान, पुन्हा महिन्याने पावसाच्या सरीवर सरी बरसू लागल्या आहेत. दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसाने शहर, उपनगरांची दैना उडाली आहे.
शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या मोठी आहे. त्यातच दोन दिवसांच्या पावसाने काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिले. रस्त्यावरील खड्डे आणि साचून राहिलेले पावसाचे पाणी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शामरावनगरसह उपनगरांमधील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहिले आहे. दरम्यान, पाणी साचून राहिले आहे. तेथील पाणी काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुरमीकरणाने थोडा दिलासा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विस्तारित भागात कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात येत आहे. या पावसाळी मुरमीकरणाने नागरिकांना थोडा दिलासा मिळतो आहे. मोकळे प्लॉट, डबक्यात साचलेले पाणी यामुळे डासांचा उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डासांचा उच्छाद वाढला आहे.