मिरज; पुढारी वृत्तसेवा : महालक्ष्मी एक्स्प्रेस मधून 25 तोळे सोने व 20 हजार रुपये रोख असा एकूण 9 लाख 29 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञाताने लंपास केली. याबाबत शुभदा अविनाश जोशी (वय 60, रा. मंगला हायस्कूजवळ, ठाणे पूर्व) यांनी मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी इचलकरंजी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी येत होत्या. सोने व रोख रक्कम घेऊन शुभदा जोशी, त्यांचे पती व दोन मुले असे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसने शुक्रवारी (दि. 16) ठाणे ते हातकणंगले असा प्रवास करीत होते.
25 तोळे सोने व 20 हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स जोशी यांनी त्यांच्या डोक्याखाली ठेवली होते. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने पहाटे कराड स्थानक सुटताच पर्स चोरून पोबारा केला.
शुभदा जोशी व त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वेत शोधाशोध केली. परंतु; चोरटा सापडला नाही. त्यामुळे चोरीप्रकरणी जोशी यांनी मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लोहमार्ग पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र, रेल्वेत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या पॅसेंजर गाड्या बंद आहेत. तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये देखील जनरल तिकीट प्रवास बंद असल्याने भुरट्या चोर्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मोठी हातसफाई केली असून, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
[visual_portfolio id="7246"]