इस्लामपूर : तुजारपुरात पत्नीसह दोघांवर खुनी हल्ला

पांडुरंग यादव-सासने
पांडुरंग यादव-सासने

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे बुधवारी सकाळी पांडुरंग बाबुराव यादव-सासने (वय 60) याने पत्नीवर तलवारीने हल्ला केला. त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेलेल्या शेजार्‍यावरही त्याने तलवारीने वार केले. या हल्ल्यानंतर संशयित पांडुरंगने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लक्ष्मी पांडुरंग यादव-सासने (वय 55), वसंत बाबुराव पवार (वय 55, रा. तुजारपूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः संशयित पांडुरंग याची तुजारपूर परिसरात शेती आहे. बुधवारी सकाळी पांडुरंग आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादावादी सुरू होती.त्यातूनच त्याने पत्नीवर तलवारीने सपासप वार केले.

लक्ष्मी जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. त्यावेळी घरासमोरून निघालेले वसंत पवार त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी हल्लेखोर पांडुरंगाला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पांडुरंगने त्यांच्यावरही तलवारीने हल्ला केला. पवार यांच्या डोक्यात खोलवर वार झाल्याने ते आणि लक्ष्मी हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आरडा-ओरडा झाल्याने शेजारचे लोक सासने यांच्या घरासमोर जमा झाले. त्यांनी ही माहिती पांडुरंग याचे चुलत भाऊ सर्जेराव सासने यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना दवाखान्यात नेले.

हल्लेखोराची आत्महत्या…

या प्रकारानंतर भेदरलेल्या पांडुरंग याने घरात जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला. घराबाहेर जमलेल्या लोकांनी बराच वेळ त्याला हाका मारून बाहेर बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आतून प्रतिसाद दिला नाही.त्याने गळफास लावून आत्महत्या केली. हल्लेखोर पांडुरंग हा तुजारपूर सोसायटीचा माजी अध्यक्ष होता. सर्जेराव सासणे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे तपास करीत आहेत.

डोक्यात तलवारीचे वर्मी घाव..

संशयित पांडुरंग सासनेने तलवारीने पत्नी लक्ष्मी यांच्या डोक्यात, हातावर सपासप वार केले. त्यांच्या डोक्यात तलवारीचे चार वार वर्मी लागले आहेत. लक्ष्मी यांना सोडविण्यासाठी आलेल्या वसंत पवार यांच्या डोक्यातही पांडुरंगने तलवारीचे चार वार केले. हे दोघेही घराच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली तलवार जप्त केली आहे. लक्ष्मी यांची प्रकृती चिंताजनक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news