सांगली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारच’ | पुढारी

सांगली : 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारच'

जत ; पुढारी वृत्तसेवा : जत (Jat) येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तयार झाला आहे. हा पुतळा बसविण्यास शासनाने विरोध दर्शविला आहे. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारच असा आक्रमक पवित्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी घेतला आहे.

प्रथम हा पुतळा नियोजित जागेत बसविण्यात येईल व त्यानंतर केंद्रीय माजी मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही जगताप यांनी पत्रकार परिषदेत संगितले.

माजी आमदार जगताप यांनी मिरज येथे भेट देत पूर्ण झालेल्या पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी जगताप बोलत होते. (Jat)

जगताप म्हणाले ,१९६७ साली देशाचे तत्कालीन कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते जत शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. २००६ साली एका वाहनाच्या धडकेने पुतळ्याचे नुकसान झाले. तेव्हापासून आतापर्यत म्हणजे तब्बल १६ वर्षे जतकर पुतळ्याच्या प्रतिक्षेत आहेत.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तयार आहे, पुतळा उभा करण्यासाठी १६ लाख रुपये खर्चून २०१५ मध्ये चबुतराही बांधला आहे पण जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या मगच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवा. अशी आडमुठी भूमिका घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे.

जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज्य शासनाचाही समाचार घेतला. पुर्वी जिथे पुतळा होता तेथेच हा पुतळा बसविण्यात येणार आहे असे असताना शासनाने त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज ज्या राज्यात जन्मले, ज्यांच्या नावाने हे शासन राज्य कारभार पाहत आहे तेच पुतळा बसविण्यासाठी आडमुठी भूमिका घेत आहेत हे बरोबर नसल्याचे सांगत शासनाचा निषेध केला.

Jat : शासनाला दिला जगतापांनी इशारा

कोरोना मुक्तीनंतर ऍक्शन मोडमध्ये आलेले माजी आमदार विलासराव जगताप यांनी पुतळ्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. पुतळा बसविण्यात शासनाची होत असल्याच्या आडमुठी धोरणाचा खरपूस समाचार घेत आम्ही तारीख जाहीर न करता नियोजित जागी पुतळा बसविणारच असून त्यानंतर अनावरण सोहळा घेणार आहोत. पुतळा बसविण्यास शासनाने त्याला विरोध केला तर जी परिस्थिती निर्माण होईल त्यास शासनच जबाबदार असेल या शब्दात त्यांनी शासनाला गंभीर इशारा दिला आहे.

Back to top button