सांगली : माजी सभापतीकडून अधिकार्‍यांना अर्वाच्च शिवीगाळ | पुढारी

सांगली : माजी सभापतीकडून अधिकार्‍यांना अर्वाच्च शिवीगाळ

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत सदस्य-पदाधिकार्‍यांतील हाणामारीचे प्रकरण ताजे असताना मंगळवारी माजी सभापती तमन्नगौडा रवी-पाटील यांनी अधिकार्‍यांना अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी संतप्त होत मुख्य प्रवेशद्वारात सभा घेऊन निषेध केला.

याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांना रवी-पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत अधिकार्‍यांकडून कामे होत नाहीत. त्यांच्याकडून गैरवर्तणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निवेदनावर अधिकारी राहुल गावडे, तानाजी लोखंडे, विजयसिंह जाधव, बाळासाहेब कामत, विकास पाटील, शीतल उपाध्ये, वि. अ. पवार, डॉ. किरण पराग, राहुल कदम, धनाजी पाटील, महेश धोत्रे, अश्‍विनी जमाले, भारती बिराजे, डॉ. व्ही. व्ही. पाटील, डॉ. मिलिंद पोरे, नामदेव माळी, एस. एम. कदम यांच्या सह्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषदेची ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा होणार होती. मात्र, सभा ऑफलाईन घेण्याची काही सदस्यांची मागणी होती. या वादातूनच सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सदस्य व अध्यक्षांचे पती आणि दीर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. हा वाद ताजा असतानाच माजी सभापती आणि

भाजपचे पक्षप्रतोद रवि-पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांच्यात मोबाईलवरुन जोरदार वादावादी झाली. या वादाचे रुपांतर शिवीगाळीपर्यंत गेले.

रवि-पाटील यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार डॉ. लोखंडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात केली आहे. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. रवि-पाटील यांना अटक करावी, अशी मागणी केली. बुधवारी काळ्या फिती बांधून काम करण्यात येणार आहे, त्यानंतरही अटक न झाल्यास काम बंदचा इशारा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

लोकांच्या हितासाठी लढू : तमन्नगौडा रवी-पाटील

याबाबत माजी पदाधिकारी तमन्नगौडा रवी-पाटील म्हणाले, सध्या कोव्हिडची परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. कामांचा निपटारा होत नाही. ग्रामपंचायत विभागाकडून घरकुलांचे अनुदान अडविले जाते. लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांना वारंवार फोन करत होतो. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. ज्यावेळी फोन घेतला, त्यावेळी माझ्याशी ते उद्धटपणेे बोलले. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या क्लिपमध्ये छेडछाड केली आहे. ते पूर्ण सत्य नाही. गुन्हा दाखल केला तरी, लढत राहू.

Back to top button