कडेगावच्या सत्तांतरात ‘कुंडल’चा दणका | पुढारी

कडेगावच्या सत्तांतरात ‘कुंडल’चा दणका

कुंडल : हणमंत माळी 
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षास पायउतार व्हावे लागले. भाजपने 7 जागांवरून 11 जागांवर मजल मारली. दरम्यान, या सत्तांतरासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याचा फटका बसला असल्याचे मानले जाते.
या निमित्ताने कडेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीने एक जागा जिंकत चंचूप्रवेश केला आहे. तसेच आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार अरुणअण्णा लाड यांचे बंधू आणि क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांचा पराभव झाला होता. या पराभवाची सल आमदार लाड व जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांच्या मनात होती.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांनी पतसंस्था गटातून महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पलूस तालुक्यात पतसंस्था गटातून किरण लाड यांना एकेरी मतदानाचा फटका बसला आणि त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता अन्य पक्षांवर विसंबून न राहता पलूस – कडेगाव तालुक्यातील आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढे स्वबळावर लढणार असल्याची भूमिका आमदार अरुण लाड यांनी जाहीर केली होती. तसेच व्यापक शिष्टमंडळासह जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत आपली भूमिका मांडली होती.

कडेगावच्या सत्तांतरात ‘कुंडल’चा दणका. राष्ट्रवादीचा नगरपंचायतीत चंचूप्रवेश
कडेगावच्या सत्तांतरात ‘कुंडल’चा दणका. राष्ट्रवादीचा नगरपंचायतीत चंचूप्रवेश : लाड यांच्या जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा?

आमदार लाड व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शरद लाड यांनी कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या जोमाने बांधणी केली. तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम केले. कडेगाव तालुक्यातील पक्षाचे जुने गटही त्यांनी सक्रिय केले. त्याचबरोबर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आमदार लाड व जिल्हा परिषदेचे प्रक्षप्रतोद शरद लाड यांनी ताकदीने सांभाळली होती.

कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 15 उमेदवार उभे करून स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगी लढत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत किरण लाड यांच्या पराभवाची सल कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भरून काढली. तसेच नगरपंचायतीत चंचूप्रवेश करत आपली ताकद दाखवून दिली आहे.

पाहा व्हिडिओ : कवठेमंकाळ नगरपंचायत आबांच्या बछड्यांन मैदान मारलं

Back to top button