कवठेपिरान चे आणखी आठ सावकार रडारवर - पुढारी

कवठेपिरान चे आणखी आठ सावकार रडारवर

सांगली : पुढारी वृत्तसेवा : कवठेपिरान (ता. मिरज) येथील सावकारी करणार्‍या प्रताप पांडुरंग भोसले, शशिकांत प्रकाश येवले, सुनील आनंदा खोत (सर्व रा. कवठेपिरान) यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यांनी सुमारे 250 वर लोकांना सावकारी कर्ज दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कवठेपिरान येथील अनेकजण सावकारी करीत आहेत. त्यातील आठ लोकांची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. तक्रार आल्यानंतर त्यांच्या विरोधातही कारवाई होणार आहे.

मिरज आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी सुरू आहे. बहुतेक सावकारांची एकजूट असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. तरीसुद्धा भोसले, येवले, खोत या तिघांविरोधात थेट पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार दाखल झाली. चौकशीत ते 5- 6 वर्षांपासून सावकारी करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याकडून 13 लाख 55 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ते मासिक 10 टक्के व्याज घेत होते.

कर्ज वसुलीसाठी दहशत व दडप शाहीचा वापर करून कर्जदारांकडून मुद्दल रकमेपेक्षा दुप्पटीने व्याज वसूल करून पीडितास त्रास देत होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर खास 3 पथके पाठवून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून सावकारीच्या वह्या जप्त केलेल्या आहेत.
गेल्या काही वर्षात सुमारे 250 लोकांना कर्ज दिल्याचे त्यामध्ये पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्याकडे तपास आहे. तपासात संशयिताकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कवठेपिरानमधील आणखी आठ सावकार पोलिसांच्या रडारवर आहेत. सावकारी करणार्‍या विरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर कारवाई होणार आहे.

सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी सांगितले, या सावकारी प्रकरणातील फिर्यादीने सावकारी त्रासाला कंटाळून सहा महिन्यापूर्वी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली; मात्र भीतीने त्याने सावकारीबाबतची माहिती पोलिसांना दिली नाही. अखेर पैसे देणे अशक्य झाल्याने त्याने थेट पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली.

Back to top button