सांगली : भाजप नगरसेवक तिरडीसह महापलिका सभागृहात घुसले | पुढारी

सांगली : भाजप नगरसेवक तिरडीसह महापलिका सभागृहात घुसले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅपेक्स कोरोना हॉस्पिटलप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसाठी सोमवारी भाजपतर्फे महापालिकेवर तिरडी मोर्चा काढण्यात आला. महापालिकेतील सभागृह नेत्यांसह भाजपचे नगरसेवक तिरडीसह महासभेत घुसले. प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, ‘अ‍ॅपेक्सबाबत महापालिका प्रशासनची भूमिका आणि प्रशासनावर होत असलेले आरोप याबाबत अहवाल तयार करा. तो अहवाल सर्व नगरसेवकांना पाठवा’, असे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. कोणी दोषी आढळल्यास कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी महापालिकेची ऑनलाईन महासभा होती. भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी सकाळी अकरा वाजता महापालिकेवर तिरडी मोर्चा काढला. महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, संजय यमगर, गजानन आलदार, इम्रान शेख, भाजपचे शहर जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक माने व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
‘अ‍ॅपेक्समध्ये 87 रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांचा धिक्कार असो’, प्रसार माध्यमांना बजावलेल्या नोटिसांबद्दल आयुक्तांचा धिक्कार असो’, ‘आयुक्त, आरोग्याधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी जोरात सुरू होती.

सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची महासभा ऑनलाईन सुरू झाली. महापौर सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके व काही अधिकारी सभागृहात होते. महासभा सुरू झाल्यानंतर विनायक सिंहासने, नगरसेवक सूर्यवंशी, मगदूम, यमगर, आलदार हे तिरडीसह सभागृहात घुसले. महापौरांसमोर घोषणाबाजी सुरू केली. अ‍ॅपेक्सप्रकरणी महापालिका प्रशासनावर होत असलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

महापौर सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात येऊन आंदोलकांचे निवेदन स्विकारले. महासभेत या विषयावर आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले. दरम्यान सूर्यवंशी यांनी महासभेच्या समारोपापूर्वी ‘अ‍ॅपेक्स’प्रकरणी आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ‘अ‍ॅपेक्स’प्रकरणी महापालिकेची भूमिका आणि प्रशासनावर होत असलेले आरोप या सर्वांचा खुलासा तयार करा. त्याचा अहवाल सर्व नगरसेवकांना पाठवा, असे आदेश त्यांनी दिला. आयुक्त कापडणीस यांनी त्यास होकार दिला.

Back to top button