बोगस लॅबोरेटरी चा वाळवा तालुक्यात सुळसुळाट | पुढारी

बोगस लॅबोरेटरी चा वाळवा तालुक्यात सुळसुळाट

इस्लामपूर : सुनील माने : शहर व परिसरात बोगस लॅबोरेटरी चा सुळसुळाट सुरू आहे. अनेक लॅबोरेटरी या नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. एखाद्या दवाखान्यात अथवा लॅबमध्ये काम केलेला कर्मचारी उठसुठ लॅब चालू करत असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यांच्यावर ना आरोग्य विभागाचा धाक व ना कोणतीही कारवाई त्यामुळे लॅब चा नुसता सावळा गोंधळ सुरू आहे.

महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या मान्यताप्राप्त व्यक्तीला क्लिनिकल लॅबोरेटरी चालविण्याचा परवाना दिला जातो.वाळवा तालुक्यात सुमारे 40 हून अधिक लॅबोरेटरी आहेत. इस्लामपुरात 20 ते 25 लॅब आहेत. त्यापैकी केवळ आठ लॅब नोंदणीकृत आहेत. बाकीचे लॅबधारक बोगसपणे काम करत असल्यामुळे त्यांची सेवा घेणार्‍या रूग्णांचा मेडिक्लेम होतच नाही.

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना अशा बोगस लॅबोरेटरी बाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष घालून जे बोगस आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.

काही डॉक्टर नोंदणीकृत लॅबमधील मुलांना जादा पगाराचे आमिष दाखवितात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये लॅब सुरू करतात. संबंधित डॉक्टरांनी लॅब सुरू करायला काहीही अडचण नाही. परंतु त्या लॅबमध्ये काम करणारा कर्मचारी परिपूर्ण शिकलेला आहे का, त्याची रजिस्ट्रेशन नोंदणी आहे का, सर्टिफिकेट, डिग्री आहे का, याची खात्रीच आरोग्य विभागाकडून केली जात नाही. काही डॉक्टर रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी आपल्याशी संबंधित लॅबमध्येच त्या रुग्णाला पाठवितात. परंतु यामध्ये त्या रुग्णाचा तोटा होत आहे. अशा गोष्टीवर आरोग्य विभागाने बंधन घालण्याची गरज आहे.

ज्या लॅबोरेटरीमध्ये जी व्यक्ती काम करते तीच व्यक्ती त्या लॅबमध्ये तपासणीसाठी उपस्थित पाहिजे, असा नियम असताना सध्या लॅबमधील असिस्टंट कर्मचारीच लॅबचा ‘कारभार’ बघत आहेत. ज्या लॅबधारकांची पॅरामेडिकल कौन्सिलला नोंदणी नाही. त्यांच्यावर कारवाई करा, असे पत्र तालुका आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहे. तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. आरोग्य विभागाने अशा बोगस लॅबवर कारवाई करून लोकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी होत आहे.

शासन गांभीर्याने घेत नाही…
काही बोगस लॅबमध्ये आवश्यक त्या मशिनरीच नाहीत. मग रिपोर्ट कसले देतात, याची तपासणी झाली पाहिजे. बी.एस्सी.पदवीधारक नसतानाही काही मंडळी बी.एस्सी. डी.एम.एल. टी पदवीचा फलक लावून लॅबचा व्यवसाय करत आहेत. आरोग्य विभागाने अशा लॅबवर तत्काळ कारवाईची गरज आहे.

Back to top button