सांगली : पाणीटंचाईमुळे आजपासून कृष्णा नदीवर उपसा बंदी!

सांगली : पाणीटंचाईमुळे आजपासून कृष्णा नदीवर उपसा बंदी!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा, कोयना, वारणा नदीवरील धरणात अत्यंत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या नद्यांचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहे. नदी काठावरील गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बुधवार, 14 जूनपासून सातारा जिल्ह्यातील टेंभू योजनेपासून म्हैसाळ योजनेपर्यंत उपसा बंदी आदेश लागू केला आहे. सांगलीसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात हा आदेश लागू आहे. पुढील चार दिवस सिंचन व बिगर सिंचनासाठी लागणार्‍या पाणी वापरात कपात केलेली आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भातील आदेश तातडीने काढले आहेत.

या आदेशामुळे हजारो हेक्टर वरील बागायती पिकांना फटका बसू शकतो. तसेच पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झालेला नाही. त्याशिवाय काही अपवाद वगळता बहुतेक भागात मान्सूनपूर्व उन्हाळी पाऊसही झालेला नाही. पावसाने मारलेली दडी व अपुरा पाणीसाठा या पार्श्वभूमीवर पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने सोमवारी केले होते. तरीही नदी काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने उद्यापासून चार दिवस सिंचन व बिगर सिंचनासाठी पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्या- व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास उपसा अनधिकृत समजून संबंधित पाणी परवाना, वीज पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येणार आहे. त्याशिवाय उपसा सिंचन सामग्री जप्त करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिला आहे.

चार दिवसानंतर…

चार दिवस उपसा बंदी केल्यानंतर पाणी म्हैशाळ योजनेपर्यंत गेल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

सांडपाणी नदीत सोडू नका

नदीमध्ये अत्यंत अपुरे पाणी असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील व सांडपाणी नदीपात्रात थेट सोडून नदीचे प्रदूषण करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी दक्षता घेऊन पाणी नाश टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news