

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : मूळ मालकाचे बनावट आधार कार्ड तयार करून परस्पर चारचाकी वाहनाची 3 लाख 50 हजाराला सतीश कृष्णा जगताप (रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) यांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांविरोधात चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षद कुंडलिक पोवार (वय 28), कुंडलिक बाबुराव पोवार (दोघे रा. दानवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व मुस्तफा काझी (रा. रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत चिंचणी वांगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील प्रमोद नारायण जवळकर यांचे चारचाकी वाहन दहा दिवसांसाठी भाड्याने हवे म्हणून संशयित हर्षद, कुंडलिक व मुस्तफा यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी वाहनाचे मूळ मालक असलेले प्रमोद जवळकर यांचे बनावट आधार कार्ड बनवून घेतले. वाहनाचा मालक मीच असल्याचे सांगून सतीश जगताप यांना 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबररोजी दरम्यान नोटरी वगैरे करून त्यांना विकले. त्यानंतर संशयितांनी वाहन विक्री केल्यानंतर बनावट चावीने जगताप यांच्या घरासमोरून वाहनच लंपास केले. वाहन लंपास झाल्यानंतर जगताप हे बनावट आधार कार्डवरून शोध घेत वाहनाचे मूळ मालक जवळकर यांच्या घरी गेले. त्यावेळी तिघा संशयितांनी त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनतर जगताप यांनी पोलिसात फिर्याद दिली.