आठ महिन्यांपूर्वी लव्‍ह मॅरेज, "तुला साेडत नाही" म्‍हणत पतीचा पत्‍नीवर काेयत्‍याने हल्‍ला

Sangali Crime News : कौटुंबिक वादातून कृत्य, हल्‍लेखाेर पती पसार
Sangali Crime News
सांगली येथे नवविवाहितेवर पतीने कोयत्याने खुनीहल्ला File Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या वासुंबे (ता. तासगाव) येथील नवविवाहित पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी सांगली कॉलेज कॉर्नर येथे घडली. प्रांजल राजेंद्र काळे (वय १९, रा. वासुंबे, तासगाव) असे जखमी नवविवाहितेचे नाव आहे. हल्लेखोर पती संग्राम संजय शिंदे (वय २५, रा. सावंतपूर वसाहत पलूस) हा घटनेनंतर पसार झाला आहे. (Sangali Crime News )

Sangali Crime News
RBI monetary policy | कर्जदारांना दिलासा कायम! रेपो दरात नवव्यांदा कोणताही बदल नाही

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. पत्नी विभक्त राहत असल्याच्या वादातून त्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हल्लेखोर संग्राम हा ट्रकचालक म्हणून काम करतो, तर प्रांजल ही सांगलीत येथे बी. कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ३ डिसेंबर २०२३ रोजी वासुंबे येथील प्रांजलशी त्याचा प्रेमविवाह झाला होता.

विवाहानंतर दोन ते तीन महिन्यातच दोघात वाद सुरू झाला. त्यातून त्याने प्रांजलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला कंटाळून प्रांजल माहेरी आली होती. गेल्या तीन महिन्यापासून ती माहेरीच होती. तरीही तो तिला त्रास देतच होता. प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोटाची तयारी चालविली होती. ही बाब कळताच संग्रामने तिला धमकीही दिली होती. याबाबत प्राजंलने तासगाव पोलिसांत संग्रामविरोधात दोनदा तक्रारही दाखल केली. तासगाव पोलिसांनी त्याला समज दिली होती.

घरी परत येण्यासाठी पत्‍नीवर दबाव

बुधवारी सकाळी प्रांजल बसने सांगलीत कॉलेजसाठी आली. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच संग्राम दुचाकी घेऊन तिची वाट पाहत होता. बसमधून उतरून ती कॉलेजमध्ये जात असताना संग्रामने तिला प्रवेशद्वारावरच अडवले. तिला परत घरी येण्यासाठी तो दबाव टाकू लागला. पण तिने नकार दिला.

यातून दोघांत वादावादी झाली. यावेळी संग्रामने पाठीमागे लपवलेला कोयता काढला. कोयता पाहताच प्रांजल तेथून पळून जाऊ लागली. यावेळी झटापटीत ती खाली पडली. 'तुला सोडणार नाही, तुझा हातच तोडून टाकतो', असे म्हणत संग्रामने तिच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. हा वार हातावर अगदी खोलवर गेला. ती आरडाओरडा करू लागली. याचवेळी एक रिक्षा चालक अमित मुळके याने ही घटना पाहिली आणि तो मदतीला धावला. कॉलेजचे तरुण, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

कोयता व दुचाकी सोडून पतीने केले पलायन

लोकांची गर्दी होताच हल्लेखोर संग्रामने कोयता व दुचाकी सोडून पलायन केले. या हल्ल्यानंतर जखमी प्रांजलला रिक्षा चालकाने सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हातावरील वार गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

खुनी हल्ल्याची माहिती मिळतात अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलिसांनी पंचनामा करून कोयता व दुचाकी जप्त केली. हल्लेखोर संग्रामच्या शोधासाठी पोलिसांची पथके पलूस, तासगावकडे रवाना झाली होती. रात्री उशिरा प्रांजल काळे हिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.

Sangali Crime News
प्रलंबित खटल्यांचा तिढा

पतीसह सासू-सासरे, दिरावर गुन्‍हा दाखल 

हल्लेखोर संग्राम पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. चौघांवर गुन्हा दाखल दरम्यान प्रांजल हिने दिलेल्या फिर्यादीनुसार या हल्ल्यातील मुख्य संशयित पती संग्राम शिंदे याच्यासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्रांजलचे सासू, सासरे आणि दीर यांचाही समावेश आहे.

संग्राम याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी कलम, तर सासू, सासरे, दिराविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. हल्लेखोराच्या शोधासाठी पथके हल्ल्यानंतर संग्राम हा माधवनगर रस्त्याच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांची चौकशी सुरू केली. तो ट्रक घेऊन पसार झाल्याचे समजते. त्याच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news