

Rupali Patil's first reaction after being removed spokesperson:
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात रुपाली पाटील यांनी केलेले वक्तव्य तर अमोल मिटकरी यांच्या विधानांमुळे महायुतीत तणाव निर्माण होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांना प्रवक्ते पदावरून हटविले आहे.
रुपाली पाटील यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणी त्यांनी थेट चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करण्याचे आरोप केले होते. चाकणकर या राष्ट्रवादीच्याच नेत्या असल्यामुळे रुपाली पाटील यांच्या आरोपांमुळे एकप्रकारे राष्ट्रवादीचीच अडचण झाली होती. त्यामुळे पक्षाने रुपाली पाटील यांना मागील आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला पाटील यांनी कायदेशीर उत्तर देण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे उत्तर मिळण्यापूर्वीच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.
रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिलं की, ''नमस्कार जय महाराष्ट्र मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार श्री.अमोल भाऊ मिटकरी, सौ.वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. या यादी बद्दल मा. अजितदादांना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल. धन्यवाद.''
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती. आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.