

महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली.
युतीच्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. “वाद-भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भूमिकेतून आम्ही एकत्र आलो,” असं त्यांनी स्पष्ट केलं. जागावाटप, आकडे किंवा कोण किती जागा लढवणार याबाबतची माहिती आत्ता दिली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे म्हणाले की, सध्या राजकारणात ‘उमेदवार पळवणाऱ्या’ डोळ्या सक्रिय आहेत, त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडूनच उमेदवारी दिली जाईल. अर्ज भरण्याबाबतची प्रक्रिया पुढे जाहीर केली जाईल. “महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, ती शिवसेना-मनसे युती आज आम्ही अधिकृतपणे जाहीर करत आहोत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
“मुंबई किंवा महाराष्ट्र वेगळं करण्याचा, किंवा मराठी माणसाला बाजूला सारण्याचा कोणीही प्रयत्न केला, तर त्याचा राजकीय अंत केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
भूतकाळातील फूट आणि अपप्रचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आता चुकाल, तर संपाल. “आता जर फूट पडली, तर संपूर्ण नुकसान होईल. एकत्र रहा, तुटू नका, फुटू नका आणि मराठीपणाचा वारसा सोडू नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला दिला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या संघर्षाचा उल्लेख करत भावनिक भूमिका मांडली. मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी मराठी माणसाने मोठं बलिदान दिलं असून, आज ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे तोच इतिहास आणि तीच आठवण असल्याचं त्यांनी सांगितलं.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाची भूमिका निर्णायक होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईसाठी झालेल्या त्या संघर्षाची परंपरा आजही जिवंत असून, त्यामुळेच हा क्षण विशेष आणि अर्थपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र औक्षण करण्यात आले. युतीच्या घोषणेआधी झालेल्या या औक्षणामुळे कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झालं. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हा क्षण मराठी माणसासाठी ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच कारमधून हॉटेल ब्ल्यू सीकडे निघाले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. दोन्ही नेत्यांचे संपूर्ण कुटुंबही स्मृतिस्थळावर उपस्थित होते. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकर तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.
2026 च्या महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येत असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी या घडामोडीचं स्वागत केलं आहे. “हा अत्यंत शुभ क्षण असून महाराष्ट्रातील जनता याची वाट पाहत होती,” असं ते म्हणाले.
मुंबई सर्वांना सामावून घेणारी आहे. आम्ही कधीही जात किंवा धर्माच्या आधारे राजकारण केलं नाही. मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचा मुद्दा आम्ही नेहमीच केंद्रस्थानी ठेवला आहे, असंही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर विशेष मांडणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो अभिवादनासाठी ठेवण्यात आले आहेत.
या मांडणीमधून महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारपरंपरेला अभिवादन करण्यात येत असून, ठाकरे बंधूंच्या युतीचा संदेश व्यापक असल्याचं अधोरेखित केलं जात आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच पुण्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यातील सेना–मनसे कार्यकर्ता चौपाळीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.
कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, दोन्ही पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतूनच घडले असून आज मराठी माणसाच्या मनातील भावना प्रत्यक्षात उतरत असल्याने आनंद होत आहे. “महाराष्ट्र तोडणाऱ्यांच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मराठी माणूस कधीही ठाकरे ब्रँड सोडणार नाही. ठाकरे ब्रँड हा ठाकरेच राहणार,” अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत युतीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. या युतीचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागपुरात भव्य जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हा जल्लोष नागपुरातील मानकापूर परिसरातील मनसेच्या कार्यालयाबाहेर साजरा केला जाणार आहे. डीजे, ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीतून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करणार आहेत. युतीच्या घोषणेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. या भेटीमुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या चर्चांना आणखी महत्त्व आलं असून, पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं आहे.
ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर वरळीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली असून, ठिकठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही ठाकरे बंधूंचीच चर्चा असून, ज्येष्ठ शिवसैनिकांनीही या युतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. अनेकांनी हा क्षण भावनिक आणि ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्रात ऐतिहासिक पर्वाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. या युतीमुळे दिल्लीत बसलेल्यांना अस्वस्थता वाटत असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. ''मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच,” असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेसाठी वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये व्यासपीठ सज्ज करण्यात आलं आहे. व्यासपीठावर केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून, त्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची चिन्हं लावण्यात आली आहेत. या ऐतिहासिक क्षणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय युतीची आज अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक आणि पुणे महानगरपालिकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. जिथे शक्य आहे तिथे इतर महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊत यांनी मराठी माणसाच्याच विरोधामुळे अनेकदा मराठी नेतृत्वाला अडचणी आल्याचा उल्लेख करत टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगराध्यक्षांच्या मेळाव्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, आगामी निवडणुकांत मराठी आणि मध्यमवर्गीय मतदार शिवसेना-मनसे युतीच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवण्याची तयारी सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेतही दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असून, संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
ठाण्यात एकूण 131 नगरसेवकांच्या जागा असून त्यापैकी ठाकरे गट 50 ते 55, मनसे 31 ते 34, शरद पवार गट 35 ते 40 आणि काँग्रेस 5 ते 10 जागांवर निवडणूक लढवू शकते. काही प्रभागांमध्ये ताकद असलेल्या जागांवर अजूनही चर्चा सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही.
भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडून काही उमेदवार परस्परांच्या चिन्हावर लढवण्याची रणनीतीही वापरली जाऊ शकते. ठाण्यात प्रत्येक वॉर्डनुसार परिस्थिती पाहून तडजोडी करत एकत्रित लढण्याचा विचार सुरू आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. दरम्यान, याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नवनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्षांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली .
या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अभिवादनाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात या घडामोडीकडे पाहिलं जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले आणि आज 24 डिसेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा हे ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषदेत करणार आहेत.
वरळीतील एका हॉटेलात बुधवारी दुपारी 12 वाजता होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या पत्रकार परिषदेकडे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल. सेना-मनसेची ही युती मुंबई, ठाण्यापुरती, की सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी, याचेही उत्तर या पत्रकार परिषदेत मिळेल.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याची बातमी ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर ट्विट करून दिली. दोन्ही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना आणि मनसे किती आणि कोणत्या जागेवर लढणार याचाही उलगडा पत्रकार परिषदेतच होईल.