

पुणे : राज्याच्या सर्वच भागांमध्ये मागील सुमारे दहा ते बारा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे; मात्र आता हा पाऊस काहीसा कमी होणार आहे. त्यातही सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतील पाऊस कमी झाला आहे. मात्र, कोकण तसेच विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस अजून 30 मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. (Pune News Update)
राज्यात सर्वच भागांमध्ये झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मे महिन्यातील सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. शिवाय मान्सून देखील वेळेच्या आधीच केरळ किनारपट्टीसह महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यानंतरही अतितीव्र मुसळधार पावसाचा वेग कमी झाला नव्हता. या पावसामुळे राज्याच्या सर्वच भागांत दाणादाण उडवून दिली. या भयाण पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. असा पाऊस आता मात्र कमी होऊ लागला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची बॅटिंग कमी झाली आहे. केवळ पावसाच्या काही सरीच पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात मात्र 3 जूनपर्यंत विजांच्या कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वार्यासह पाऊस बरसणार आहे. कोकणात किनारपट्टीवर जोरदारा वार्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोषक स्थितीमुळे मान्सूनची वाटचाल सुरू असून, येत्या दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल (काही भाग) सिक्कीमपर्यंत धडक मारणार आहे, तर सध्या उत्तर दक्षिण बंगालचा उपसागर, ओरिसाच्या किनार्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या पट्ट्याचे पुढील 24 तासांत तीव— कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होणार आहे, तसेच पश्चिम बंगाल ते उत्तर छत्तीसगड पार करून मध्यप्रदेशापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.
असे आहेत ’यलो अलर्ट’
रायगड, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेज अलर्ट
रायगड, सिंधुदुर्ग, अमरावती, गोंदिया.
कोकण, विदर्भात अजून किमान तीन दिवस बरसणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार रूपांतर