

निनाद देशमुख
पुणे : खडकवासला येथील सशस्त्र दलांसाठी अधिकारी तयार करणारी देशातील मानाची संस्था राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) येत्या 30 तारखेला यंदा इतिहास घडवणार आहे. एनडीएच्या 148 व्या तुकडीतील पहिल्या महिला कॅडेट्स ‘अंतिम पग’ पार करणार आहेत. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेऊन देशाच्या सेवेसाठी ‘त्या’ सज्ज झाल्या आहेत. या 17 रणरागिणींनी हजारो अडथळ्यांचा सामना करून देशातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे. या मुलींसह 300 मुलेदेखील एनडीएतून पदवी प्राप्त करून भारतीय सशस्त्र दलात पदार्पण करणार आहेत.
कुठलीही ‘स्त्री’ ही ‘शक्ती स्वरूप’ असते, असं आपली भारतीय संस्कृती सांगते. हेच ओळखून मुलींना देखील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत व पर्यायाने सैन्य दलामध्ये प्रवेश देण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये दिलेल्या अंतरिम आदेशामुळे मोकळा झाला होता. या ऐतिहासिक प्रवासात सहभागी झालेल्या कॅडेट्सनी त्यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि देशाप्रती असलेली बांधिलकी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. एनडीएत जून 2022 मध्ये मुलींची पहिली बॅच प्रविष्ट झाली. एनडीचे वातावरण पाहून या मुली भारवल्या. शिस्त, अनुशासन आणि सहकार्यांचे मार्गदर्शन यामुळे पहिल्याच बॅचमधून उत्तीर्ण होणार्या या कॅडेट्ससाठी हा क्षण अत्यंत गौरवाचा आहे. तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणात त्यांनी केवळ शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित केल्या नाहीत, तर एक मजबूत नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व देखील त्यांनी निर्माण केलं आहे.
एनडीएमध्ये दाखल होण्यापूर्वी अभियांत्रिकीचे पहिले वर्ष पूर्ण करणारी बटालियन कॅडेट कॅप्टन ऋतुल ही हवाई दलाची कॅडेट आहे. ती म्हणाली, एनडीएतील प्रशिक्षण कठीण असेल याचा अंदाज होता. त्यामुळे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आम्ही सक्षम होऊ हा देखील विश्वास होता. येथे आल्यावर त्याचीच प्रचिती आली. येथील व्यवस्था पाहून मी भारावून गेले होते. प्रशिक्षणाची सर्व व्यवस्था पूर्वनियोजित होती. आमच्यासाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था होती. तीन वर्षात अनेक रोमांचकारी क्षण अनुभवले. सुरवातीला आमचे केस कापले. भविष्यातील कोणत्याही परिस्थितीचे नेतृत्व करण्यासाठी व ती सक्षमपणे हाताळण्यासाठी आमची येथे तयारी करवून घेतली गेली आहे. शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, खेळ, क्रॉस कंट्री रेस आणि प्रशिक्षणाच्या विविध पैलूंनी आम्ही आता कणखर बनलो आहोत. आमच्या तुकडीतील 13 जणींना सहाव्या टर्ममध्येच कॅडेट अपॉइंटमेंट मिळाल्या आहेत, ही देखील अभिमानास्पद बाब आहे.
एनडीएमध्ये दाखल होण्यापूर्वी दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या कॅडेट इशिता शर्मा हिने एनडीएमध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले. ती ‘डिव्हिजन कॅडेट कॅप्टन’ पदावर कार्यरत आहे. लवकरच ती भारतीय लष्करात दाखल होईल. ईशिता म्हणाली, आम्हाला एनडीएत नेहमीच समान संधी मिळाल्या. मुलांच्या बरोबरीने आम्ही प्रशिक्षण घेतलं. आमच्या शारीरिक क्षमता विचारात घेऊन काही प्रशिक्षण निकषांमध्ये योग्य बदल केले गेले होते. एनडीएमध्ये मुलींचा समावेश व पहिल्या बॅचमधून उत्तीर्ण होणे हे महिला आणि महिला सक्षमीकरणासाठी खूप महत्त्वाचं आहे. सशस्त्र दलांत नेतृत्वाची भूमिका बजावताना महिलांना कायमस्वरूपी कमिशन मिळाल्यास, देशातील तरुणींना एनडीएत जाण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.