

रोहा; पुढारी वृत्तसेवा : अलिबाग येथील ६ तरुण पळस येथील आंबा नदीच्या पलिकडे उंदीर पकडण्यासाठी गेले असताना नदीत पाणी वाढल्याने हे तरुण पलिकडेच अडकले. महसुल विभागाला माहिती मिळताच रोहा महसुली विभाग व नागोठणे पोलिस ठाण्याच्या मदतीने कोलाड येथील महेश सानप यांच्या टिमने तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
रोहा तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका व आंबा नदी दुथडी भरुन वाहत आहे. जोरदार पाऊस पडत असतानाही अलिबाग येथील ६ तरुण पळस येथे आंबा नदीच्या पलिकडे दुपारच्या सुमारास उंदिर पकडण्यासाठी गेली होती. पडणारा पाऊस व भरतीमुळे आंबा नदीचे पाणी वाढले. त्यामुळे ते तरुण पलिकडेच अडकले. याची माहिती मिळताच तहसिलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथक महेश सानप त्यांच्या टिमने या मुलांना सायंकाळी बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले.
तहसिलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभाग, महेश सानप यांचे बचाव पथक, नागोठणे पोलिस निरीक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस यांनी विशेष परिश्रम घेतले.