

Zirad school became hi-tech due to digital
अलिबाग : रमेश कांबळे
झिराड येथील जिल्हा परिषदेची शाळा आता विविध डिजिटल पायाभूत सुविधांमुळे हायटेक बनली आहे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या भागीदारीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम हायकलच्या 'सृजन' या व्यापक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कार्यक्रमाचा एक भाग आहे. कंपनीच्या प्रकल्प परिसरातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, हा 'सृजन'चा उद्देश आहे. या सुविधांमुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग खुला झाला आहे.
या उपक्रमांतर्गत हायकलने शाळेचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकले. मोडकळीस आलेल्या फर्निचरऐवजी ७० नवीन लाकडी बाके देण्यात आली. डिजिटल आणि संवादात्मक शिक्षणासाठी ४३ इंचांचे ८ एलईडी स्मार्ट टीव्ही बसविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी एक प्रोजेक्टर आणि स्क्रीन देण्यात आली, तर शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सुलभकरण्यासाठी मल्टीफंक्शन प्रिंटरची सुविधा पुरविण्यात आली. याशिवाय, शाळेत छत असलेला स्वतंत्र हँडवॉश झोन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही वातावरणात मुलांना स्वच्छता आणि आरोग्य यांची नीट काळजी घेता येईल.
विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित, उत्साहवर्धक आणि शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या सुविधांचा उद्देश आहे. यामुळे नियमित उपस्थिती वाढेल आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा हायकलने व्यक्त केली आहे. हायकलमध्ये आम्ही नेहमीच असा विश्वास ठेवतो की एखाद्या व्यवसायाचे यश केवळ आर्थिक आकड्यांपुरते मर्यादित नसते. खऱ्या अर्थाने मूल्यनिर्मिती तेव्हाच होते, जेव्हा विकास सामायिक केला जातो - जेव्हा आपले सभोवतालचे समुदाय आपल्या बरोबर प्रगती करतात. हेच तत्वज्ञान आम्हाला अनेक वर्षांपासून मार्गदर्शक ठरले आहे आणि आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे हायकलने म्हटले आहे.
ग्रामीण भारतातील ही शाळा - इतर अनेक शाळांप्रमाणेच - मोठ्या क्षमतेसह, हुशार मुलं आणि समर्पित शिक्षक असूनसुद्धा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मर्यादित राहिली होती. आज आपण त्या क्षमतेला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. हीच आमची समावेशक विकासाची आणि अधिक न्याय्य भविष्य घडवण्याची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते, असे हायकल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष जय हिरेमठ म्हणाले.