Palghar News : 75 हरित बोटींसह 10 जलमार्गांचे जाळे आकार घेतेय

दळणवळणात जलवाहतुकीचा नवा अध्याय; 29 जेट्टी उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात
green boats project
संग्रहित छायाचित्रfile photo
Published on
Updated on
विरार : चेतन इंगळे

मुंबई आणि महानगर परिसरात वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून जलवाहतुकीच्या नव्या योजनेने वेग घेतला आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या प्रकल्प अहवालानुसार, येत्या 28 महिन्यांत मुंबईसह परिसरात प्रवाशांसाठी 10 जलमार्गांवर हरित बोटींची सेवा सुरू होणार असून, यासाठी 75 पर्यावरणपूरक बोटी आणि 29 जेट्टी उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

जलवाहतुकीच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात प्रवास करणार्‍या लाखो नागरिकांना पर्यायी आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी सुमारे 1.63 लाख बोट ट्रिप्सची क्षमता निर्माण होणार असून, 2031 पर्यंत या सेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांची संख्या 1 कोटी ते 1.63 कोटी दरम्यान असेल, असा अंदाज आहे. एका बोटीची किमान क्षमता 100 प्रवासी गृहीत धरून ही योजना आखण्यात आली आहे.

सदर योजनेत वसई ते नरीमन पॉईंट हा 61 किलोमीटरचा जलमार्ग सर्वाधिक फायदेशीर ठरणार असून, त्यानंतर बेलापूर-गेटवे-मांडवा (38 किमी), वसई-मिरा भाईंदर-गाईमुख-नागळे (17 किमी), आणि कोळशेत-मुलुंड-ऐरोली-वाशी-गेटवे (50 किमी) हे मार्ग महत्त्वाचे ठरणार आहेत. या मार्गांवर 20 टक्के आंतरर्गत नफा दर (आय.आर.आर) मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रस्तावित 10 मार्गांपैकी तीन मार्ग (क्रमांक 1, 8 आणि 10) आर्थिकदृष्ट्या कमी फायदेशीर आहेत. त्यापैकी मार्ग क्रमांक 7 साठी 60 टक्के अर्थसहाय्य (व्हेबिलिटी गॅप फंड) देण्याची गरज आहे. कोची वॉटर मेट्रो यशस्वीपणे राबवणार्‍या कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) या सल्लागार संस्थेने ही शिफारस केली आहे.

जलवाहतुकीच्या सुसूत्र अंमलबजावणीसाठी राज्याचे बंदर व जलमार्ग मंत्री नितेश राणे यांनी जुहू, वर्सोवा, महिम, वांद्रे, वर्ली आणि कांदिवली येथे नव्या प्रवासी जेट्टी उभारण्याचे निर्देश महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिले आहेत.

हा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी सध्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून, यानंतर कंत्राट मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश हा सुमारे 6,328 चौरस किलोमीटरचा विस्तृत भाग आहे आणि 2025 पर्यंत येथील लोकसंख्या 26.91 दशलक्षपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या भागात असलेल्या नद्या, खाडी व किनारपट्टीमुळे जलवाहतुकीस अपार संधी आहे, मात्र अंमलबजावणीदरम्यान अनेक अडचणी येऊ शकतात. सध्याचे बोट सेवा चालवणारे उद्योजक पावसाळी हवामान, माशांच्या जाळ्यांचा अडथळा, टायडल फरक, साचणारा गाळ आणि पुरेशा सुविधा नसणे यांसारख्या समस्या मांडत आहेत.

मुंबईतील जलवाहतूक सेवा केवळ स्वतंत्र मार्ग नव्हे, तर ती मेट्रो, लोकल, बस आणि टॅक्सी यांच्यासोबत एकात्मिक पद्धतीने कार्यरत राहिली तरच ती यशस्वी ठरेल. अखंड सेवा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारी कनेक्टिव्हिटी हीच या प्रकल्पाच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरेल.

सतीश सहस्रबुद्धे, माजी अतिरिक्त परिवहन आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news