

अलिबाग : सोशल मीडियावरुन झालेल्या मैत्रीत एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर प्राणघातक हल्ला होण्याची घटना कनकेश्वर मंदिर परिसरात घडली. सरप्राईज देण्याच्या बहाण्याने युवतीच्या डोक्यात हातोडीचे घाव घातल्याने युवती गंभीर जखमी झाली असून,हल्लेखोर आणि त्याचे अन्य साथीदार हे फरार झाले आहेत.सुरज बुरांडे (मुळचा आक्षी साखर, सध्या थेरोंडा वरसोल पाडा ) असे हल्लेखोराचे नाव आहे.
टीव्ही मालिकेतील पटकथेला साजेशी अशी ही थरारक घटना कनकेश्वर मंदिर परिसरात घडली. सोशल मीडियावरून सुरज बुरांडे या तरुणाची 21 वर्षीय युवतीशी वर्षभरापूर्वी ओळख झाली. चॅटींग करता करता मैत्रीही वाढली. त्यातून सुरजचे या युवतीवर एकतर्फी प्रेमही बसले. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता त्याने फोन करून या युवतीला कनकेश्वर मंदिरात इतर मित्रासोबत जाण्याचा आग्रह धरला.
ती नाईलाजाने गेल्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन दोघे खाली उतरत असताना सुरजने तुला सरप्राइज द्यायचे आहे असे सांगून तिला वडाच्या झाडाखाली नेले. डोळे बंद करण्यास सांगून, क्षणातच त्याने बॅगेतून लोखंडी हातोडी काढून तिच्या डोक्यावर व कपाळावर जोरदार वार केले. त्यात युवती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली.
हल्ल्यानंतर सुरजने तू माझी नाही झालीस, तर कोणाचीही होऊ देणार नाही असे म्हणत तिला धमकावले आणि अंधार होईपर्यंत तिथेच बसवून ठेवले. शेवटी तीव्र वेदनेत असलेल्या पीडितेने रात्री सव्वा आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी विनवणी करीत होती की तु मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तुझ्या प्रपोजचा विचार करीन असे सांगीतले.त्यामुळे हल्लेखोर तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेला.
विनायक पाटील आणि सौरभ कुलाबकर यांनी ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे युवतीने पोलिसांना सांगीतले. या हल्ल्यात पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.