

Raigad Cyber Crime News
पनवेल : डेटिंग अॅपवर झालेली ओळख चांगलीच महागात पडल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेल परिसरात समोर आली आहे. एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची प्रेमाचे आमिष दाखवून तब्बल ७४ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीने मार्च २०२४ मध्ये 'बम्बल' या डेटिंग अॅपवर 'झिया' नावाच्या महिलेच्या संपर्कात येत मैत्री केली. सुरुवातीला व्हॉट्सअॅप चॅटिंग व कॉलच्या माध्यमातून दोघांमध्ये संबंध वाढले. त्यानंतर महिलेने गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि मोठ्या नफ्याचे खोटे दाखले देत ज्येष्ठ नागरिकाकडून हळूहळू लाखो रुपये उकळले. गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली सुरुवातीला २५ हजार रुपये गुंतवल्यानंतर ३५६० रुपयांचा नफा दाखवण्यात आला. हे पाहून भुललेल्या पीडिताने टप्प्याटप्प्याने एकूण ५८ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर २ कोटींचा नफा मिळाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र हा नफा मिळवण्यासाठी कर भरणे आवश्यक असल्याचे सांगून आणखी १४ लाख २० हजार रुपये उकळण्यात आले.
महिलेने सतत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नियम बदलले जात असल्याचे कारण देत, उर्वरित नफा मिळवण्यासाठी पुन्हा २२ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. मात्र वेळोवेळी पैसे भरूनही नफा मिळत नसल्यामुळे पीडिताच्या लक्षात आले की, तो ऑनलाइन ठगीचा बळी ठरला आहे. या प्रकाराची जाणीव होताच त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात (फसवणूक), आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.