

पेण : राज्यभर सुरू असणाऱ्या बिबट्याच्या प्रकरणाला अनुसरून राज्यातील वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे ही काळाची गरज बनलीअसल्याचे प्रतिपादन खा.धैर्यशील पाटील यांनी पेण येथे केले.
पेण तालुक्यातील वन विभागाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यवेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार रविंद्र पाटील, उप वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक भाईसाहेब चौरे, वन अधिकारी कुलदीप पाटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, वन अधिकारी बालाजी उद्योगपती राजू पिचिका, पंचायत समिती सभापती महादेव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पेण तालुक्यात असणारे वनखात्याचे कार्यालय हे कमी जागेत आणि शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने वाहतूक कोंडीचा सामना येथील कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. मात्र आता स्वतःच्या जागेत आणि मुंबई - गोवा हायवेला लागून उंबर्डे फाटा येथे हे नवे कार्यालय सुरू झाल्याने आणि येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होत आहे.
राज्यभरात जो बिबट्या प्रकरणी विषय गाजत आहे त्याला अनुसरून आता बिबट्याची फक्त नसबंदी करून फायदा नाही, तर आता वन खात्याशी निगडीत असणारा वन्य जीव संरक्षण कायद्यात बदल करणे ही काळाची गरज आहे. राज्यभरात नागरिकांवर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे विशेष करून शेतकऱ्यांना धोक्याचे झाले आहे. त्यांचे संरक्षण करणे ही आता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विशेष लक्ष देऊन या वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे असे सांगितले.आमदार रविंद्र पाटील यांनी देखील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि कोकणासारख्या निसर्गाने नटलेल्या नैसर्गिक संस्कृतीला टिकवण्याचे काम खऱ्या अर्थाने हे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत,त्यांच्यामुळेच वनसंपत्ती टिकून राहत आहे, त्यामुळे त्यांना जो निधी लागेल किंवा ज्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत मागणी केली जाईल त्यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असे सांगितले.
या भागात असणाऱ्या ज्या ज्या रस्त्यांसाठी विशेष करून पेण- खोपोली राज्यमार्गात अडथळा निर्माण होत असणाऱ्या गोगोदे खिंडीतील रस्त्याच्या रुंदीकरणात आम्ही पाठपुरावा करून वन खात्याशी निगडीत रस्त्यांचे प्रश्न देखील सोडविले जातील आणि ज्याप्रमाणे संबंधित अधिकारी विविध गोष्टींसाठी निधीची मागणी करतील त्यासाठी राज्यासह केंद्र सरकारचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू असे देखील सांगितले.